औरंगाबाद/नांदेड : गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातून निवडून आलेले दोन्हीही खासदार या वेळी लोकसभेच्या रिंगणात असतील की नाही, याविषयी संभ्रम निर्माण झाले आहे. गुजरात निवडणुकीच्या प्रभारी पदाची जबाबदारी काँग्रेस पक्षाने टाकली असल्यामुळे तेथील २८ जागांवरील उमेदवारांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात मी गुजरातमध्ये असेन. पण तरीही निवडणूक लढवा, असे पक्षाने आणि प्रदेशाध्यक्षाने सांगितले तर लोकसभेच्या रिंगणात असू शकेन. सध्या उमेदवारीबाबत माझ्या मनात संभ्रम असल्याचे खासदार राजीव सातव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. तर गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी राज्याचे नेतृत्व स्वीकारावे म्हणून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, असा त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. परिणामी मोदी लाटेत राज्यात काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे दोन्ही खासदार लोकसभा निवडणुकीत उमेदवार व्हायचे की नाही, याबाबत संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.

खासदार सातव यांच्यावरील नव्या जबाबदारीमुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण, याची चाचपणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काही निवडक सहकाऱ्यांबरोबर खलबतं केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. गणपती विसर्जनाच्या चार दिवसआधी चव्हाण यांचा नांदेडमध्ये मुक्काम होता. या वास्तव्यातील भरगच्च कार्यक्रमात त्यांनी एका रात्री शारदा भवन शिक्षणसंस्थेच्या परिसरातील ‘शंकर स्मृती’मध्ये बसून पक्षाच्या जिल्ह्यतील विद्यमान आमदारांसह मागील विधानसभा निवडणुकीत देगलूरमध्ये पराभूत झालेले रावसाहेब अंतापूरकर, मुखेडमधील हणमंतराव पाटील बेटमोगरेकर तसेच नांदेडचे माजी महापौर अब्दुल सत्तार यांच्याशी संवाद साधला.

या बैठकीस उपस्थित असणाऱ्या एका आमदाराने या वृत्तास दुजोरा दिला. पाच वर्षांपूर्वी २०१४ च्या निवडणुकीपूर्वी चव्हाण यांना नांदेडमधील लोकसभेच्या उमेदवारावरून बराच खल करावा लागला. चच्रेअंती त्या वेळी तत्कालीन खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांना निरोपाचे श्रीफळ देऊन स्वत चव्हाण उमेदवार झाले होते. दरम्यान नांदेड लोकसभा लढविण्यासाठी भाजपकडून आमदार प्रताप पाटील चिखलीकरही उत्सुक आहेत. त्यांनी ‘आदेश’ आला तर निवडणूक लढवू, असे पत्रकारांना सांगितले.

डॉ. पद्मसिंह पाटील यांचीही माघार

काँग्रेसमधून निवडून आलेले दोन्ही खासदार लोकसभेत उमेदवार असतील की नाही याची अद्याप निश्चिती नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीतील डॉ. पद्मसिंह पाटील यांनीही लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचे ठरविले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. जिल्ह्य़ातील काही निवडक कार्यक्रमांना डॉ. पाटील हजेरी लावत असले तरी त्यांच्याऐवजी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून अन्य उमेदवार दिला जावा, अशी रचना केली जात आहे. पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनाही उमेदवारीच्या अनुषंगाने विचारणा झाली असल्याचे सांगण्यात येते. यामुळे उमेदवार कोण असणार, याबाबत उत्सुकता आहे.

राज्यातून निवडून आलेले कॉंग्रेसचे दोन्हीही खासदार या वेळी लोकसभेच्या रिंगणात असतील की नाही, याविषयी संभ्रम आहे. खासदार राजीव सातव यांच्यावर पक्षाने गुजरात निवडणुकीच्या प्रभारी पदाची जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे सध्या उमेदवारीबाबत माझ्या मनात संभ्रम असल्याचे राजीव सातव यांनी सांगितले. तर गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी राज्याचे नेतृत्व स्वीकारावे म्हणून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, असा त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणूक लढवणार का, याबाबत शंका आहे.