त्र्यंबकेश्वरजवळील दुगारवाडी धबधब्याच्या परिसरात शनिवारी बेपत्ता झालेल्या सिडकोतील महाविद्यालयीन युवकाचा मृतदेह रविवारी पोलिसांच्या हाती लागला.
प्रत्येक पावसाळ्यात दुगारवाडी धबधबा पर्यटकांचे आकर्षण असतो. गेल्या काही दिवसांपासून हा धबधबा जोमाने कोसळत असल्याने जिल्ह्य़ाच्या विविध भागांतून पर्यटकांचे जथे धबधब्याचा आनंद घेण्यासाठी जात असून त्यात युवावर्गाचा अधिक प्रमाणावर समावेश आहे. शनिवारी नाशिक येथील काही महाविद्यालयीन विद्यार्थी सायंकाळी पाचच्या सुमारास धबधब्याजवळ फिरावयास गेले असता पवन नंदकिशोर माहेश्वरी (२२) हा सिडकोतील सावतानगर येथे राहणारा विद्यार्थी बेपत्ता झाला. पवनसोबत असलेल्या इतर युवकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांशी संपर्क साधला. पवनच्या पालकांसह इतर नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नातेवाईकांसह घटनास्थळी तपास केला असता परिसरात त्याचे कपडे मिळून आले. आंघोळीसाठी पाण्यात उतरलेला पवन बुडाल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली. हा परिसर दुर्गम आणि जंगलचा असल्याने शनिवारी शोधकार्य थांबवून रविवारी पुन्हा सुरू करण्यात आले असता सकाळी नऊच्या सुमारास पवनचा मृतदेह मिळून आला. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.