पुण्यातील तळजाई पठारावरील स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या एका १७ वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी ही दुर्देवी घटना घडली. प्रफुल्ल भीमराव वानखेडे (१७) असे मृत मुलाचे नाव आहे. दत्तावाडी येथे राहाणारा प्रफुल्ल रविवारी संध्याकाळी पोहोण्यासाठी पूलवर आला होता. त्याचा मित्रही सोबत होता.

प्रफुल्ल पोहता-पोहता तलावातील खोलगट भागात गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याने पाण्याबाहेर येण्याचा प्रयत्न केला पण त्याला जमले नाही असे पोलिसांनी सांगितले. ही घटना घडली त्यावेळी जीवरक्षक स्विमिंग पूलवर उपस्थित नव्हता. प्रफुल्लने मदतीची मागणी केल्यानंतर पूलमधील अन्य स्विमर्सनी त्याला बाहेर काढले.

त्याला लगेच जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी प्रफुल्लला मृत घोषित केले. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून लाईफ गार्ड का नव्हता? त्याची चौकशी सुरु केली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.