मुलाच्या बहिणीलाही पळवून नेले होते

यवतमधून (दौंड, पुणे) लहान मुलाचे अपहरण करून त्याच्याकडून पाकीटमारी, भीक मागणे अशी कामे करून घेणाऱ्या दाम्पत्याला कोतवाली पोलिसांनी रविवारी रात्री शेवगावमध्ये अटक केली व त्यांच्या ताब्यातून मुलाची सुटका केली. याच दाम्पत्याने मुलाच्या बहिणीचेही अपहरण केले होते, तिचाही असाच गैरमार्गासाठी अवलंब झाला होता. तिचीही अशीच पोलिसांच्या मदतीने सुटका झाली होती.

गोटय़ा ऊर्फ राम कान्हू माने (वय ७) असे सुटका केलेल्या मुलाचे नाव आहे. नगर शहरातील रिमांड होम संस्थेच्या चालकांना खोटी कागदपत्रे दाखवून, फसवणूक करून गोटय़ाचे अपहरण केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी अश्फाक वैभव काळे (३०, रा. धामणगाव देवीचे, पाथर्डी) व त्याची पत्नी मिर्चना (२८) या दोघांना अटक केली आहे.

गोटय़ाचे वडील भटक्या समाजातील असून ते यवतजवळ मजुरी करतात. सुमारे अडीच वर्षांपूर्वी गोटय़ा व त्याच्या बहिणीचे (वय १०) या दाम्पत्याने अपहरण केले. त्यांना पाकीटमारी, खिसे कापणे शिकवले. दोघा मुलांकडून हे दाम्पत्य भीक मागण्याचे कामही करवून घेत. हे दाम्पत्यही भटक्या समाजातील आहे. या वाममार्गासाठी हे दाम्पत्य दोघांना पुणे, सातारा, दौंड या ठिकाणी नेत असे. वर्षांपूर्वी नगरमध्ये आणले असता भिंगारच्या कॅम्प पोलिसांना ही बहीण भीक मागताना आढळल्याने त्यांनी तिला नगरच्या रिमांड होममध्ये दाखल केले.

काही दिवसांतच पाथर्डी पोलिसांना गोटय़ा उचलेगिरी करताना आढळला. त्यालाही पोलिसांनी रिमांड होममध्ये दाखल केले. मुलीची माहिती मिळाल्याने कान्हू माने यांनी तिचा रिमांड होमकडून ताबा घेतला व तिला घरी नेले. घरी आल्यावर तिने रिमांड होममध्ये दादा (गोटय़ा) दिसला होता, अशी माहिती दिल्याने माने पुन्हा रिमांड होममध्ये त्याचा ताबा घेण्यासाठी आले. परंतु तोपर्यंत अश्पाक काळे यालाही गोटय़ा रिमांड होममध्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्याने व पत्नीने गोटय़ा आपलाच मुलगा आहे, असे दाखवणारी खोटी कादपत्रे सादर केली. त्यासाठी धामणगाव देवीचे येथील सरपंचाचे ओळखपत्र सादर केले. या ओळखपत्रात आपण काळे याला ओळखत असून गोटय़ा त्याचाच मुलगा असल्याचे नमूद केले होते.

परंतु माने तेथे पोहोचल्यावर खरी बाब स्पष्ट झाली व रिमांड होमच्या व्यवस्थापनाने काळे दाम्पत्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राहुल पाटील यांनी या गुन्हय़ाचा तपास केला. महिन्यापूर्वी हे दाम्पत्य दौंड येथे आल्याची माहिती मिळाली होती, परंतु त्याचा सुगावा लागल्याने मुलासह हे दाम्पत्य पसार झाले. ते शेवगाव येथे आल्याचे समजल्यावर पाटील यांच्यासह हवालदार बापू म्हस्के, ईस्माईल पठाण, धामणे, इनामदार यांच्या पथकाने रविवारी सापळा रचून दोघांना अटक केली व मुलाला ताब्यात घेतले. मुलाला रिमांड होमच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या लहान मुलानेच हे दाम्पत्य त्याच्याकडून कशा प्रकारे काम करवून घेत होते, नाही केले तर कसा छळ करत होते, याची माहिती दिली.