News Flash

उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई..!

या अभागी भावंडांची एक चित्रफित प्रसारित झाल्यानंतर लोकसत्ताने तेथे प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा या वेदनेमागचे अनेक पैलूही उघड झाले.

(संग्रहित छायाचित्र)

राखी चव्हाण

* बाबांचा मृत्यू, आई बेपत्ता, पाच चिमुकले वाऱ्यावर

* वेदनेचे भांडवल करून काकाची ‘कमाई’

चार अशक्त बांबूंवर उभी एक मोडकी झोपडी..त्यातल्या एका फाटक्या सतरंजीवर ते पाच अभागी जीव अर्धपोटी एकमेकांना कवटाळून झोपतात..यातला सर्वात मोठा १० वर्षांचा तर सर्वात छोटा चार वर्षांचा..मध्यरात्री केव्हातरी त्याला आईची कूस हवी असते..तो उठतो, किंचाळतो..आई कुठेच दिसत नाही. बाबांना तरी बिलगावे म्हणून शोधतो..जग सोडलेल्या बाबांचा मळलेला शर्ट तेवढा दिसतो खुंटीवर..पण, बाबाही नसतोच झोपडीत..मग, मोठा भाऊच बाबा होतो..चारही भावंडांना कुशीत घेतो..पहाटे सूर्य आग ओकत थेट  झोपडीत शिरला की याच भावांच्या अन्नासाठी डफडे घेऊन बाहेर पडतो. वडोदा ते कुही मार्गावरील आंबाडी नावाच्या गावकुसावरील  गोपाळ समाजाच्या पाडय़ातील हे विदारक चित्र तसे रोजचेच. पण, करोनाने त्याची विदारकता शतपटीने वाढवून टाकली आहे.

या अभागी भावंडांची एक चित्रफित प्रसारित झाल्यानंतर लोकसत्ताने तेथे प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा या वेदनेमागचे अनेक पैलूही उघड झाले. तारेवरची कसरत करून मोठा लहानग्यांचे पोट भरतो, पण करोनाने या चिमुकल्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. आजपर्यंत ढुंकूनही न पाहणाऱ्या आप्तस्वकियांनी शासनाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी त्यांचा वापर केला तर मदतीच्या नावाखाली काही स्वयंसेवींनी ध्वनीचित्रफित तयार करून त्यांना आणखी नागडे केले. परिणाम काय तर त्या चिमुकल्यांवर हक्काची झोपडी सोडून सरकारी निवारागृहात जाण्याची वेळ आली. सवंगडय़ांना दूर कुणीतरी नेत आहे हे बघून इतर झोपडय़ांमधील चिमुकल्यांना मात्र हुंदका आवरत नव्हता.

करोनाच्या विळख्यात जो कुणी आला, त्याचे शारीरिक, मानसिक व आर्थिकदृष्टय़ा कंबरडे मोडले. यातून सारे सावरतीलही, पण उपराजधानीतल्या मौदा तालुक्यातील चिमुकल्यांवर जी वेळ आली ती कुणावरही येऊ नये. या दुर्दैवी कुटुंबातील मोठा मुलगा रवी आणि त्याची इतर चार भावंडे येथे राहतात. वर्षभरापूर्वी त्यांच्यावरील पितृछत्र हरपले.

आजी आणि आईचे भांडण झाले आणि आईनेही घर सोडले. त्यामुळे खेळण्याचे वय असतानाही रवीने दोरीवरचे खेळ करत आपल्या भावंडांची जबाबदारी स्वीकारली. त्यातच करोनाने पाय पसरायला सुरुवात केली आणि टाळेबंदीत सारे व्यवहार ठप्प झाले. शहरी नागरिकांचे ठीक, हातावर पोट असणाऱ्यांना मात्र जगणे अवघड झाले. त्यातच अशांसाठी सरकारने मदत जाहीर केली. मदत मिळाल्यानंतरही ती आणखी कशी साठवता येईल, यादृष्टीने चढाओढ सुरू झाली. या परिस्थितीचा फायदा या चिमुकल्यांच्या काकाने घेतला. सरकारी मदतीनंतर इतरही स्वयंसेवी मदतीसाठी गावात येत आहेत हे पाहून या चिमुकल्यांना त्याने समोर केले. बापाचे छत्र हरपलेले. आई घर सोडून गेलेली. अशावेळी काका सांगेल ते ऐकण्यावाचून पर्याय नव्हता. कुणीतरी मदत करताना चित्रफित तयार केली आणि समाजमाध्यमांवर एका रात्रीत ती पसरली. त्यामुळे अवघ्या २४ तासात या गावात बाहेरून येणाऱ्यांची रिघ लागली.

निरागस त्या चिमुकल्यांना काय होत आहे ते कळत नव्हते आणि काका मात्र ही झोपडी धान्याने भरून घेण्यात मग्न होता. प्रशासनाला ही बाब कळली आणि हा झालेला घोळ सावरण्यासाठी त्यांना चिमुकल्यांना त्यांच्या निवाऱ्यातून बाहेर काढून सरकारी आश्रयात न्यावे लागले. जिल्हा बालकल्याण समितीच्या आदेशानुसार सुधारगृहात पाठवण्यात आले. जेथे त्यांचा जन्म झाला, जेथे त्यांचे सवंगडी होते, ती सोडून जाण्याची वेळ मात्र त्यांच्यावर कधीही मदतीला न आलेल्या काकांमुळे आली. ज्या चिमुकल्यांच्या जीवावर त्याने धनधान्यांनी झोपडी भरली होती, त्या चिमुकल्यांना कुणीतरी घेऊन जात आहे, याचे जराही शल्य त्याला नव्हते. आजीच्या डोळ्यात आसवे होती, पण त्यात ओलावा नव्हता.

बाल न्याय अधिनियम २०१५ अंतर्गत कलम ७५ नुसार अशी काही परिस्थिती असेल तर स्वयंसेवी असो वा गावातील संबंधित प्रशासकीय व्यक्ती, त्याला ही वस्तुस्थिती प्रशासनाला कळवावी लागते. मात्र, या घटनेची ध्वनीचित्रफित समाजमाध्यमांवर पसरली. स्वयंसेवी अजय साखरकर यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर जिल्हा महिला बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांना याबाबत कारवाईचे आदेश दिले. संरक्षण अधिकारी साधना हटवार, स्वयंसेवक स्नेहा सोनटक्के यांच्या सहाय्याने प्रशासकीय कारवाईसाठी ते सकाळपासून गावात तळ ठोकू न होते. मौदा पोलिसांच्या सहकार्याने त्यांनी या पाचही मुलांना ताब्यात घेतले. त्यांची आरोग्य तपासणी करुन त्याची रवानगी नागपूरच्या एक बालसंरक्षण गृहात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 12:55 am

Web Title: boy struggle for his brother and sister in lockdown situation abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 राजापूरच्या गंगेचे वर्षांच्या आतच आगमन
2 शेतमाल वाहतुकीसाठी रेल्वे मालगाडय़ांची मदत
3 पंढरपुरात एका परदेशी साधकासह ‘इस्कॉन’च्या चौघांविरोधात गुन्हा
Just Now!
X