दिल्लीत सामूहिक बलात्कार झालेली पीडित मुलगी आपल्या आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत धैर्याने लढत राहिली. भारतीय नारीचे प्रतीक म्हणून तिचे नाव कायम राहील. उद्याच्या बळकट समाजनिर्मितीच्या उभारणीसाठी तिचे बलिदान कामी येईल, अशा शब्दात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मृत मुलीच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. मुलीवरील बलात्कार आणि त्यात झालेला तिचा मृत्यू या घटनेचा जेवढा म्हणून निषेध नोंदवावा तेवढाच कमीच आहे. या घटनेच्या संदर्भात आपण धैर्याने सामोरे गेले पाहिजे. त्यावर भांडत बसण्याची ही वेळ नाही, असे मतही राष्ट्रपतींनी व्यक्त केले.
राष्ट्रपती मुखर्जी शनिवारी सोलापूरच्या भेटीवर आले होते. त्यांनी दिल्लीतील बलात्कारित मुलीच्या मृत्यूच्या घटनेची स्वत: दखल घेत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. राष्ट्रपती मुखर्जी यांनी येथील कार्यक्रमात आपल्या भाषणाची सुरुवात पीडित मुलीच्या मृत्यूच्या घटनेने केली. त्या मुलीने जीवन जगताना जे धाडस दाखविले, त्याला वंदन करायला हवे, असे नमूद करीत केंद्र सरकारने या मुलीचे प्राण वाचविण्यासाठी मोठे प्रयत्न केले. परंतु, दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. तिच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. भारतीय संस्कृती शांतता, नैतिकतेवर आधारलेली आहे. यात हिंसेला स्थान नाही. महिलेकडे देवी, माता, कन्या, भगिनी अशा विविध रूपांमध्ये आपण पाहतो. त्यांना समाजात निर्भय वातावरणात राहता यावे यासाठी अशा घृणास्पद घटना घडू नयेत याची दक्षता घेतली पाहिजे, अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली. मुलीचे प्राण वाचविण्यासाठी तिला अद्ययावत वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी सिंगापूरला हलवावे लागले. तशीच गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सुविधा आपल्या देशात निर्माण केली पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.         
सुशीलकुमार तातडीने दिल्लीला रवाना..  
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना सोलापूरच्या डॉ. निर्मलकुमार फडकुले नाटय़संकुलाचा लोकार्पण सोहळा व अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आग्रहाने निमंत्रित केले होते. त्यानुसार राष्ट्रपतींचे सोलापुरात आगमन झाले. सुशीलकुमार शिंदे हे राष्ट्रपतींच्या कार्यक्रमासाठी एक दिवस अगोदर म्हणजे काल, शुक्रवारीच सोलापुरात आले होते. त्यांनी राष्ट्रपतींच्या कार्यक्रमांच्या नियोजनाचा आढावा घेतला होता. परंतु शनिवारी पहाटे नवी दिल्लीत सामूहिक बलात्कार झालेल्या पीडित मुलीचा सिंगापूर येथे उपचार घेताना अखेर मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तेव्हा केंद्रीय गृहमंत्री म्हणून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सुशीलकुमार शिंदे यांनी दोन्ही कार्यक्रमांपासून दूर राहणे पसंत केले . मात्र दिल्लीकडे रवाना होण्यापूर्वी विमानतळावर शिंदे यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले व राष्ट्रपती पंढरपूरकडे रवाना झाल्यानंतर दुपारी उशिरा पावणेचार वाजता शिंदे दिल्लीला रवाना झाले.