त्यांचे चालण्याचे सुख वयाच्या ४ थ्या वर्षीच हिरावले गेले. पण त्यातून खचून न जाता मीनाक्षी बनल्या इतरांसाठीही प्रेरणा! स्वत:च्या स्वावलंबनासाठी त्यांनी बँकेत नोकरी केलीच, पण त्याचबरोबरीने ‘हॅण्डिकॅप्स असोसिएशन’ची स्थापना करून अनेक अपंगांना स्वावलंबी केले. त्यातून ८० हून अधिक जणांवर पोलिओची शस्त्रक्रिया करून त्यांना पायावर उभे केले. इतकेच नव्हे तर अपंग खेळाडूंची टीमही तयार केली. त्यातल्या तिघींना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळवून देणाऱ्या, उत्कृष्ट अपंग कर्मचारी राष्ट्रपती पुरस्कार, महाबँक भूषण पुरस्कार मिळवणाऱ्या मीनाक्षी देशपांडे या आजच्या दुर्गेच्या कर्तृत्वाला आमचा सलाम!
महायोग पीठ, जेथे भक्त पुंडलिकाचा कर्मयोग घडला. भगवंत त्यासाठी तिष्ठले त्या पंढरपूर क्षेत्री ५५ वर्षांपूर्वी रमा आणि रघुनाथ कृष्ण देशपांडे यांच्या घरी कन्यारत्न जन्मले, मीनाक्षी. त्यांना शाप मिळाला होता पोलिओचा, मात्र आयुष्यभर आपल्या पायावर उभ्या न राहू शकणाऱ्या मीनाक्षीताईंनी ‘हॅण्डिकॅप्स असोसिएशन’ स्थापन केली. अनेकांवर ‘पोलिओ शस्त्रक्रिया’करवून त्यांना पायावर उभे केले, संस्थेमार्फत व्यवसाय प्रशिक्षण देऊन अनेकांना स्वावलंबी केले, अपंग खेळाडूंची टीमही तयार केली. तिघींना राज्य सरकारचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळवून दिला आणि स्वत: बँकेत नोकरी करून स्वावंलबी जगण्याचा उ:शाप मिळवला.
चार वर्षांपर्यंत धावणाऱ्या, बागडणाऱ्या मीनाक्षीला एकाएकी खूप ताप भरला. तो ताप मीनाक्षीचे पाय घेऊनच गेला. डॉक्टरांचा निर्णय होता, ‘मीनाक्षीला पोलिओ झाला आहे. आता ती कधीच उभी राहणार नाही. चालणारही नाही.’ बघता बघता वयाची ६-७ वर्षे उलटली. एक पाय नसणे याखेरीज मीनाक्षी सर्वसाधारण मुलीसारखी होती. तिच्या शिक्षणाचे कसे होणार ही चिंता वडिलांना लागली. त्यांचे प्रयत्न सुरू झाले. पण अशा मुलीला शाळेत कोण प्रवेश देणार? क्षुल्लक कारणे दाखवून शाळा तिला प्रवेश नाकारू लागल्या. पण वडील शिक्षणाच्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी उपोषणाचा निर्धार केला, काही सुजाण लोकांनी मध्यस्थी केली अन् वयाच्या ८ व्या वर्षी मीनाक्षीला शाळेत प्रवेश मिळाला.
मीनाक्षी ३-४ थीमध्ये गेल्यावर शाळेत उचलून नेणे-आणणे कठीण व्हायला लागले. त्यावेळी तिच्या वडिलांनी एक महागडी बाबागाडी विकत घेतली. या बाबागाडीने मीनाक्षीची कॉलेजच्या पहिल्या वर्षांपर्यंत सोबत केली. त्यानंतर पुढील शिक्षणाचा विषय सुरू झाला. गावातील एकमेव महाविद्यालय घरापासून ३ कि.मी लांब. तिने आपल्या पायावर उभे रहावे ही बाबांची इच्छा पूर्ण होण्यासाठी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. प्राचार्यासह सर्वच जण समंजस भेटल्याने वेळोवेळी मदत मिळत गेली आणि मीनाक्षी १९७२ साली द्वितीय श्रेणीत बी.कॉम उत्तीर्ण झाली. आता बाबागाडीच्या ऐवजी अपंगांना हाताने चालवता येईल अशी ३ चाकी सायकल उपलब्ध होती पण ७५० रुपयांना. १९६८ साली तिच्या बाबांनी दरमहा ३० रुपये हप्त्याने ती सायकल विकत घेतली आणि मीनाक्षीचे शिक्षण मार्गी लागले.
शिक्षणानंतर नोकरीचा शोध सुरू झाला. बँकेच्या परीक्षा देणे, अर्ज पाठवणे सुरू होते. अनेक ठिकाणी चांगल्या मार्कानी उत्तीर्ण होऊनही हातावर चालत येणाऱ्या मीनाक्षीला कामावर घ्यायला कुणी तयार नव्हते. तशातच कर्करोगाने आईचे निधन झाले. त्याच्या १३ व्या दिवशी सोलापुरातल्या बॅंक ऑफ महाराष्ट्र अर्थात महाबॅंकेने तिला व्यक्तिगत मुलाखतीस बोलावले. व्यवस्थापक विचारी, समंजस होते. मीनाक्षीची तीन चाकी सायकलवरून खाली उतरण्याची, ३-४ पायऱ्या चढून इमारतीत प्रवेश करण्याची आणि खुर्चीवर बसण्याची धडपड, जिद्द पाहून त्यांनी तिची नोकरीसाठी निवड केली. मात्र आपल्या मायेच्या माणसांपासून त्या दूर श्राविकेच्या महिला वसतिगृहात राहू लागल्या. बँक ते वसतिगृह १ कि.मी.ची चढण चढणे ही रोजची परीक्षा होती, मात्र परावलंबित्वाच्या कुबडय़ा त्यांना दूर फेकून द्यायच्या होत्या. यथावकाश नियमानुसार त्यांना पंढरपूरला बदलीही मिळाली. या काळात त्यांनी ना आपल्या अपंगत्वाचा बाऊ केला ना त्याचे भांडवल!
अपंगत्वाच्या अनुभवातून येणारे दु:ख सहअनुभूती देत असते. त्यातूनच शोध सुरू झाला, माझ्यासारखे असे अजून किती आहेत? याचा. खेडय़ापाडय़ांतून येणारे बँकेचे ग्राहक त्यांच्याकडे विचारणा करीत. शेजारपाजारचेही आपल्या कुणा अपंग नातेवाईकाबद्दल गाऱ्हाणे सांगत. त्यांनी माहिती गोळा करायला, आजूबाजूच्या कुठेही भेटणाऱ्या अपंगांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. यातूनच १९९२ ला ‘हॅण्डिकॅप्स असोसिएशन’ची उभारणी झाली. आयुष्यातील आनंद हरवून बसलेल्या अपंगांना प्रेरणा देण्याचे काम ही संस्था करू लागली. अपंगांची नावनोंदणी, त्यांच्या गरजा, अडचणी याची माहिती तयार होत गेली, दरवर्षी कोल्हापूर येथील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.पी.जी.कुलकर्णी हे पोलिओ तपासणी शिबीर घेत. त्या शिबिरातून अपंगाच्या गरजांनुसार व्हीलचेअर्स, तीनचाकी सायकली, कॅलीपर्स, कुबडय़ा अशी कृत्रिम साधने ‘हॅण्डिकॅप्स असोसिएशन’ ही संस्था पुरवू लागली. संस्थेने आतापर्यंत १५० तीनचाकी सायकली, २५-३० व्हीलचेअर्स, ३५०-४०० अपंगाना कॅलीपर्स, कुबडय़ा मोफत दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर ७०-८० मुला-मुलींवर पोलिओ शस्त्रक्रिया करून त्यांना आपल्या पायावर उभे रहायला मदत केली आहे.
या कामाबरोबरच त्यांनी आपली खेळांची आवड खेळात सहभागी होऊन, अपंगांना मार्गदर्शन करून पूर्ण करायला सुरुवात केली. जागतिक अपंग दिनानिमित्त दरवर्षी जिल्हा पातळीवर क्रीडास्पर्धाचे आयोजन रोटरी-लायन्सच्या मदतीने सुरू केले. दरवर्षी आसपासच्या खेडय़ातून दीडशेच्या आसपास अपंग मुले-मुली पंढरपूरला येत असत. त्यातूनच पुढे राज्य व राष्ट्रीय पातळीवरील क्रीडास्पध्रेसाठी मीनाक्षीताईंच्या नेतृत्वाखाली १२ ते २० जणांचा संघ मदानात उतरू लागला. १९८७ पासून आतापर्यंत मुंबई पुणे नागपूर दिल्ली बंगळुरू अशा स्पध्रेतून सहभागी झालेल्या मुला-मुलींनी ‘निवारा क्रीडा पुरस्कार’, ‘हुतात्मा जिल्हा क्रीडा पुरस्कार’, ‘कुकरेजा पुरस्कार’ आदी असंख्य पदके जिंकली आहेत. तर कौतुकास्पद बाब म्हणजे द्रौपदी शेळके, सुमन जगताप, स्वाती डिसले या तीन मुलींना राज्य सरकारचा मानाचा समजला जाणारा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला आहे.
आज सर्वसाधारण व्यक्तीलाही नोकरी मिळणे जिथे दुरापास्त तिथे अपंग मुली कुठे टिकणार, या विचाराने त्यांनी अपंग मुलींना व्यवसाय प्रशिक्षणाद्वारे राखी, ग्रीटिंग्ज, आकाश कंदील, मोत्याच्या विविध वस्तू, बेडशीट, बॅग्ज अशा विविध २०-२२ वस्तूंचे प्रशिक्षण सुरू केले. त्यांच्या वस्तू विविध ठिकाणी प्रदर्शनात मांडण्यात येतात. त्यातून अपंग मुलींना कामाच्या प्रमाणात योग्य मोबदला दिला जातो.
या साऱ्या वाटचालीत विनाकारण सोसाव्या लागणाऱ्या यातनांवर फुंकर घालणारेही अनेक जण भेटले. महाबँकेसोबत चिन्मय मिशन, रामकृष्ण मिशन, स्वरूपायोग प्रतिष्ठान तसेच पंढरपूरचा इनरव्हील लायनेस कृष्ण यांनीही सातत्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान दिले. मीनाक्षीताईंच्या या कार्याची पोहोचपावती समाजानेही दिली ते विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करून. उत्कृष्ट अपंग कर्मचारी राष्ट्रपती पुरस्कार, महाबँक भूषण पुरस्कारांसह आजपर्यंत त्यांना ३६ पुरस्कार मिळाले आहेत.
स्वत: अपंग असूनही इतरांना आपल्या पायावर उभ्या करण्यासाठी धडपडणाऱ्या मीनाक्षीताईंनी समाजासाठी फार मोठा आदर्श उभा केला आहे.
संपर्क – वृंदावन ४५६६
कराड नाका पंढरपूर-४१३३०४
९८२२८०४४६०
hapandharpur@gmail.com
loksattanavdurga@gmail.com