विधानसभा निवडणुकीत ‘एक अच्छा आदमी’ या घोषवाक्याच्या आधारे शालेय शिक्षणमंत्री राजेद्र दर्डा यांनी केलेल्या प्रचारतंत्रावर आक्षेप घेत चिकलठाणा भागातील जवाहरलाल भगुरे यांनी या प्रकरणी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात सर्वेक्षण केले जात असून पिवळ्या रंगाचे मनगटी पट्टेही (बँड) वाटले जात आहेत. या बॅन्डवर एक अच्छा आदमी असा मजकूर आहे.
‘टीम औरंगाबाद’ या नावाने विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वेक्षण हाती घेण्यात आले. त्यात शहरात कोणत्या सुविधा हव्या आहेत, या बाबत ६ प्रश्न विचारण्यात आले. या प्रचारावर आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितले जाईल, असे आचारसंहिता भंग कक्षाच्या प्रमुखांनी सांगितले. असा प्रचार होत आहे काय, याची तपासणी करून उमेदवाराने त्याचा खर्च सादर केला आहे, हे तपासले जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी फेसबुकवरील मजकुरावरूनही तक्रार दाखल करण्यात आली.