संगमनेरमध्ये बेकायदेशीर रीत्या वास्तव्य करून राहिलेल्या नेपाळमधील तबलीगी जमातीच्या १४ जणांची चौकशी केली जाणार आहे. त्यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, दिल्ली शहरातील निजामुद्दीन भागातील तबलीगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमानंतर नगर जिल्ह्यत वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करून राहिलेल्या परदेशी नागरिकांविरुद्ध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे आता त्यांची चौकशी होणार आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलीगी जमातीच्या मरकजच्या कार्यक्रमानंतर ४६ व्यक्ती नगर जिल्ह्यत आल्या होत्या. त्यापैकी २९ जण हे परदेशी नागरिक आहेत. त्यांनी जामखेड, नेवासे, राहुरी, संगमनेर, नगर शहर, शेवगाव, बोधेगाव, कोल्हार, लोणी, दाढ, हसनापूर आदि अनेक ठिकाणच्या धार्मिक स्थळांमध्ये वास्तव्य केले होते. जिल्ह्यत आतापर्यंत २० जणांना करोनाची बाधा झाली असून त्यापैकी ३ जण हे तबलीगीशी संबंधित नाहीत. मात्र १७ जणांचा तबलीगीशी संबंध आहे. काही परदेशी व्यक्तींसह त्यांच्या संपर्कात आलेल्यांना करोनाची बाधा झाली.

निजामुद्दीनच्या कार्यक्रमानंतर दि. १४ मार्च रोजी परदेशी व्यक्तींसह ४६ जण सर्वप्रथम नगरला आले. मुकुंदनगर भागात दोन दिवस वास्तव्य केल्यानंतर ते दि. १६ मार्च रोजी जिल्ह्यच्या विविध भागात गेले. जामखेड येथील धार्मिक स्थळात दि. २५ मार्चपर्यंत त्यांचे वास्तव्य होते. तर नेवासे, संगमनेर, राहुरी, कोल्हार येथे त्यांचे वास्तव्य हे अधिक काळ होते. धार्मिक स्थळांमध्ये परदेशातील, परप्रांतातील तसेच शहराबाहेरील कोणीही व्यक्ती आला तर त्याची माहिती देण्याचे बंधन विश्वस्तांवर आहे. तशा नोटिस त्यांना यापूर्वी देण्यात आलेल्या आहेत. मात्र ही माहिती दडवून ठेवल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले होते.

परदेशी नागरिकांकडे पर्यटक व्हिसा असताना ते धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले. व्हिसा अटी व प्रतिबंधात्मक आदेशाचा त्यांनी भंग केला म्हणून आज जामखेडसह विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे आता त्यांचा व्हिसा रद्द होणार असून काही काळ त्यांना पोलीस कोठडीत राहावे लागेल. फ्रान्स, आयव्हरी कोस्ट, टांझानिया, इराण, जिबुटी, इंडोनेशिया, नेपाळ, अशा अनेक देशातील हे नागरिक आहेत.

नेपाळमधील १४ परदेशी नागरिकांचे वास्तव्य संगमनेर येथील एका धार्मिक स्थळात तसेच रहेमतनगर भागातील एका इमारतीत होते. त्यांना नगरला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. नेपाळमधून आलेल्या या परदेशी नागरिकांकडे नागरिकत्वाचे प्रमाणपत्र आहे. मात्र ते खरे आहे की नाही याची शहानिशा केली जाणार आहे. काही परदेशातील लोक हे नेपाळला वास्तव्य केल्यानंतर तेथे नागरिकत्वाची कागदपत्रे तयार करतात. नंतर ते भारतात येतात. यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या वास्तव्याची शहानिशा केली जाणार आहे.

अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई

* फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप व ट्विटर आदि समाजमाध्यमातून जातिधर्मात तेढ निर्माण करणारे तसेच करोना विषाणूच्या संसर्गजन्य आजाराबाबत विविध संदेश टाकून अफवा पसरविल्या जात आहेत. नगरच्या संगणक गुन्हे शाखेने त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. असे कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.

* समाज माध्यमांवर चुकीची व धार्मिक तेढ पसरविणारे संदेश प्रसारित करण्यात आले. जामखेड व श्रीरामपूर येथील पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोन गुन्हे नोंदविण्यात आले. समीन बागवान (श्रीरामपूर) व अन्सार नबाब (रा. लोणी, ता.जामखेड) यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.