वर्ल्डकपमधील व्यस्त वेळापत्रकातून दोन दिवसांची रजा घेत वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लाराने बुधवारी राज्यातील चंद्रपूर येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. प्रकल्पाचे उपसंचालक गुरुप्रसाद यांनी त्याला ताडोबावरील पुस्तक भेट दिले आणि त्याचा सत्कार केला.

आठवडाभरापूर्वी भारताचा गोलंदाज अनिल कुंबळे ताडोबात येऊन गेला होता. ताडोबातील जंगलाचे आणि वाघाचे फोटो त्याने लाराला दाखवले. ते फोटो पाहून लारा कुंबळेला म्हणाला की, मलाही ताडोबाला जायचे आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये लारा समालोचन करत आहे. या व्यस्तवेळपत्रकातून त्याने वेळ काढला आणि थेट चंद्रपूरमध्ये पोहोचला.

मंगळवारी रात्री लारा ताडोबात पोहोचला. त्याने कोलारा गेटवरील गेस्टहाऊसला मुक्काम केला. बुधवारी सकाळी तो सफारीला निघाला. तेव्हा वाघासह अस्वल, रानकुत्रे असे अनेक प्राणी त्याला दिसले. अनेक पक्षीही त्याने पाहिले. ताडोबाचे जंगल त्याला इतके आवडले की ‘बरे झाले मी दोन दिवसाची सुटी काढून येथे आलो’ अशी प्रतिक्रिया त्याने दिली. ‘हे जंगल पाहून धन्य झालो’ असे तो म्हणाला. त्याला वन्यप्राणी आणि पक्ष्यांबद्दल बरीच माहिती असल्याचे यावेळी दिसून आले.

“लारा यापूर्वीही भारतात आला आहे आणि बराच फिरला आहे. अनिल कुंबळेची फोटोग्राफी अतिशय सुंदर आहे आणि ते फोटो पाहूनच लाराला येथे येण्याचा मोह आवारला नाही”, असे वन्यजीवप्रेमी अनिरुद्ध चावजी यांनी सांगितले. सकाळच्या सफारीनंतर तो वनविभागाच्या रेस्टहाऊसला आला. याठिकाणी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक गुरुप्रसाद यांनी त्याला ताडोबावरील पुस्तक भेट दिले आणि त्याचा सत्कार केला. याठिकाणी पुन्हा यायचे आहे असे तो म्हणाला. दुपारी तो रवाना झाला.