पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील नाव काढणे व जामिनासाठी मदत करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना नानल पेठ पोलीस ठाण्याच्या दोघा पोलीस हवालदारांना न्यायालय परिसरात रंगेहाथ पकडले. या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नानल पेठ पोलीस ठाण्यात तक्रारदारावर गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्यातून नाव काढण्यासाठी व जामिनाकरिता मदतीसाठी नानल पेठ पोलीस ठाण्याचे हवालदार राजेश रामचंद्र िशदे व पोलीस नाईक अब्दुल समी महमंद खाजा यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. शनिवारी (दि. २१) पोलीस नाईक अब्दुल समी याने तक्रारदाराला दहा हजार रुपये न्यायालय परिसरात आणून देण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल गायकवाड यांच्याशी संपर्क करून तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून आज न्यायालय परिसरात सापळा रचण्यात आला. पोलीस हवालदार राजेश िशदे याने तक्रारदाराकडून दहा हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दहा हजार रुपये हस्तगत करून दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
थकीत वेतन काढण्यासाठी दीड लाखाची लाच घेणारा अटकेत
अशोक पवार व निर्मला उटगे यांच्यावर कारवाई
वार्ताहर, उस्मानाबाद
 संस्थेत कार्यरत शिक्षकाच्या सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम काढण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना संस्थाचालक अशोक पवार आणि संस्थेच्या सचिव निर्मला उटगे यांना गुरुवारी रंगेहाथ पकडले. लाचखोर शिक्षण संस्थाचालकाला गजाआड करण्यात आले असून, उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
 सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम त्याचबरोबर अन्य सेवा फरकाची रक्कम अशी एकूण सात लाख ५० हजारांहून अधिक रक्कम शासनाकडे प्रलंबित होती. ही रक्कम मिळवून देण्यासाठी संस्थाचालक वेळोवेळी त्यांना चार लाख रुपये लाच मागत होते. त्यांच्याकडून त्याला नकार देण्यात आला. त्यामुळे संस्थाचालकाने सप्टेंबर २०१३ मध्ये या शिक्षकांना किरकोळ कारणावरून नोकरीवरून काढून टाकले होते. संस्थाचालकाच्या या निर्णयाविरोधात त्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने या शिक्षकाच्या बाजूने निकाल देत केवळ एका तारखेत प्रकरण निकाली काढले आणि त्यांना सेवेवर रुजू करून घेण्यात यावे, तसेच त्यांची प्रलंबित असलेली सर्व देयके अदा करण्यात यावीत, असे आदेश १३ जून २०१३ रोजी दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार या शिक्षकास संस्थेमध्ये २७ जानेवारी रोजी सामावून घेण्यात आले. त्यानंतरही संस्थाचालकांकडून वेळोवेळी त्यांना त्रास दिला जात होता. संस्थाचालक अशोक पवार आणि संस्थेच्या सचिव निर्मला उटगे यांनी सेवेत कायम ठेवण्यासाठी व मागील सेवा फरकाची सर्व रक्कम मिळवून देण्यासाठी १० लाख रुपये लाच मागितली. आठ लाख रुपये मागील सेवा फरकातून वजा करून दोन लाख रुपये रोख लाच या शिक्षकाकडून मागण्यात आली. तडजोडीअंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले. गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सरस्वती विद्यालय येथे संस्थेच्या सचिव उटगे यांना दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.