हर्षद कशाळकर

निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या वादळग्रस्त व्यवसायिकांची विमा कंपन्यांकडून लुबाडणूक सुरु झाली आहे. विमा रक्कम मंजूर करण्यासाठी आपदग्रस्त व्यवसायिकांकडून थेट लाच मागितली जात आहे. जिल्हा प्रशासनाने यात हस्तक्षेप करून संबंधितांवर कारवाई करावी. अशी मागणी केली आहे. निसर्ग चक्रीवादळाचा श्रीवर्धन परिसराला जोरदार तडाखा बसला. वादळात अनेक व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले. या व्यवसायांसाठी त्यांनी लाखो रुपयांची कर्जही काढली होती. बँकाकडून या कर्जप्रकरणांचा विमाही उतरविण्यात आला होता. वादळात नुकसान झालेल्या व्यवसायिकांना बँकेकडून विमा रक्कमेचा दावा करणारे अर्ज सादर करण्याची सुचना करण्यात आली. हे अर्ज भरून दिल्यानंतर विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षणही करण्यात आले. मात्र विमाची देय रक्कम मंजूर करण्यासाठी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधीकडून थेट लाचेची रक्कम मागितली जात असल्याच्या तक्रारी आता समोर येऊ लागल्या आहेत.

विम्याचा दावा मंजुर करण्यासाठी नुकसानीच्या लाखो रुपयांची मागणी केली जात आहे. अर्जदाराने ही रक्कम देण्याची तयारी दर्शवली नाही तर तांत्रिक कारणे पुढे करून तुमचा विमा क्लेम रद्द केला जाऊ शकतो, अशी भिती दाखवली जात आहे. प्रशासनाने यात हस्तक्षेप करून विमा कंपन्यांना सूचना देणे गरजेचे आहे. तसेच लाच मागणाऱ्या प्रतिनिधींवर तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. श्रीवर्धनमधील काही व्यवसायिकांनी खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली आणि विमा कंपन्याच्या तक्रारींचा पाढाच वाचला.

‘वादळात माझ्या गोडाऊ नचे जवळपास २० लाखांचे नुकसान झाले आहे. विमा कंपनीनी चार लाख रुपयांची विमा रक्कम देण्याची तयारी दर्शवली. पण त्यासाठी विम्याच्या देय रकमेली एक लाख आम्हाला द्या. अशी मागणी विमा कंपनीच्या प्रतिनिधीने केली. रक्कम अगाऊ  दिली नाही तर विमा क्लेम रद्द करण्याची धमकी दिली.’

– निलेश जाधव, व्यवसायिक

‘ रिसॉर्टसाठी मी बँकेकडून कर्ज घेतले होते. या कर्जप्रकरणाचा बँकेनी विमा उरवला होता. वादळानंतर बँकेनी विमा रक्कमेचा दावा करण्याची सुचना केली. त्याप्रमाणे अर्जही केला. वादळात सुमारी अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे नमुद केले होते. मात्र विमा कंपनीच्या अधिकाऱ्यााकडून प्रकरण मंजूर करण्यासाठी १ लाख रुपयांच्या रक्कमेची मागणी केली. रक्कम देणार नसाल तर नो क्लेम अर्ज भरून देण्यास सांगीतले.’

– निलेश कर्णेकर, व्यवसायिक

‘श्रीवर्धन गेलो होतो तेव्हा या संदर्भात माझ्याकडे लेखी तक्रारी आल्या आहेत. त्यांची गंभीर दखल मी घेतली आहे. उद्या अलिबागच्या जिल्हाधिकारी कार्यालयात यांसर्भात एक बैठक होईल. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. संबधित विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.’

– सुनील तटकरे, खासदार रायगड</p>