सध्या करोनाचा कहर वाढला असताना त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाने आरोग्य विभागात नोकर भरती सुरू केली आहे. परंतु या नोकर भरतीत प्रशासनात लाचखोरी होत असल्याचे प्रकार घडत आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेत अशाच प्रकरणात बंधपत्रित परिचारिका म्हणून नेमणूक होण्यासाठी तयार केलेली फाईल वरिष्ठांकडे सादर करताना ४० हजारांची लाच घेण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी दोघा कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले.

अलीसाहेब अ. रजाक शेख व कुमार नागप्पा बसमुंगे अशी या कारवाईत सापडलेल्या दोघा कर्मचाऱ्यांची नावे आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात अलीसाहेब शेख हा कनिष्ठ प्रशासनाधिकारी तर कुमार बसमुंगे हा वरिष्ठ सहाय्यक पदावर नेमणुकीस आहे. आरोग्य विभागात बंधपत्रित परिचारिकांची भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यात एका महिलेच्या बंधपत्रित परिचारिकापदावर नेमणुकीचा प्रस्ताव तयार झाला होता.

त्याची फाईल वरिष्ठांकडे सादर करायची होती. या कामासाठी वरिष्ठ सहायक कुमार बसमुंगे याने एक लाखाची लाच मागितली. तडजोडीत ८० हजार रूपये देण्याचे ठरले. त्याचा पहिला हप्ता ४० हजार रूपये घेताना शेख व बसमुंगे यांना त्यांच्या कार्यालयातच पकडण्यात आले.

सहाय्यक पोलीस आयुक्त संजीव पाटील व पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.