राज्यात ५० हजारांपेक्षा जास्त वीट निर्मिती करणाऱ्या वीट भट्टीधारकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतिपत्र बंधनकारक असेल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली.
मंत्रालयात महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्या शिष्टमंडळाने पारंपरिक वीट भट्टीसंदर्भात पर्यावरणमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीत पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अन्बल्गन आदी मंडळी उपस्थित होते.
एकावेळी ५० हजारापेक्षा कमी विटांची निर्मिती करत असल्यास त्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतिपत्र बंधनकारक नसेल. मात्र ५० हजारापेक्षा जास्त वीट निर्मिती करत असतील तर अशा वीट भट्टीधारकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतिपत्र बंधनकारक राहील. तसेच एकावेळी ५० हजारांची निर्मिती केल्यानंतर तीन दिवसांनंतरच दुसरी वीट भट्टी लावण्यात यावी. वीट भट्टीचे ठिकाण एक हजार लोकसंख्या असलेल्या वस्तीपासून आणि राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून कमीत कमी २०० मीटर अंतराच्या पुढे असावे, असेही त्यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 6:44 pm