28 September 2020

News Flash

वीटभट्टीवर काम करणाऱ्या माता-पित्याची धडपड; मुलांसाठी रात्री २ वाजता सुरु केला पायी प्रवास

आठ दिवसांपासून डोळ्याआड असलेल्या मुलांच्या काळजीने दोन वर्षांच्या शिवमला कडेवर घेऊन या नवरा-बायकोनं पायीच प्रवास सुरु केला आहे.

उस्मानाबाद : वीटभट्टीवर काम करणारं हे दाम्पत्य आपल्या चिमुकल्याला भेटण्यासाठी सव्वाशे किमीचा पायी प्रवास करीत आहेत.

रविंद्र केसकर

वीटभट्टीवर मोलमजुरी करणारे पवार दाम्पत्य आपल्या दोन मुलांना कामाच्या ठिकाणीच ठेवून गावी गेले होते. गावाकडे आईचे वर्षश्राद्ध उरकून मुलांकडे परतण्यापूर्वीच सगळे काही ठप्प झाले. गाड्या बंद, पोलिसांची धास्ती आणि दुसरीकडे मुलांची काळजी. आठ दिवसांपासून डोळ्याआड असलेल्या मुलांच्या काळजीने दोन वर्षांच्या शिवमला कडेवर घेऊन या नवरा-बायकोनं पायीच प्रवास सुरु केला आहे. उपाशी मुलांच्या काळजीपोटी उस्मानाबाद तालुक्यातील टाकीतोरंबा ते भूम तालुक्यातील हिवरा अशी तब्बल सव्वाशे किलोमीटरची पायपीट करण्याची दुर्दैवी वेळ या दोघांवर आली आहे.

चाळीशी पार केलेले बालाजी पवार भूम तालुक्यातील हिवरा येथे वीटभट्टी कामगार आहेत. त्यांच्या समवेत त्यांची पत्नी सविता देखील वीटभट्टीवर काम करते. १९ मार्च रोजी गावाकडे आईचे वर्षश्राद्ध असल्यामुळे दोन वर्षाच्या शुभमला सोबत घेऊन बालाजी पवार गावी आले. अवघ्या दोन दिवसांत परत यायचे असल्याने १० वर्षीय विशाल आणि त्याहून लहान असलेल्या काजलला वीटभट्टीवरच ठेवले. उस्मानाबाद तालुक्यातील टाकीतोरंबा येथील घरगुती कार्यक्रम आटोपल्यावर दुसऱ्या दिवशी गावीच त्यांचा मुक्काम पडला आणि सगळे गणित हुकले.
२१ मार्च रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांनी लोकडाउन जाहीर केले. दुसऱ्या दिवशी जनता कर्फ्यु आणि त्यानंतर पुकारलेल्या संचारबंदीमुळे पवार दाम्पत्य गावातच अडकले. सगळ्या गाड्या बंद असल्याने मुलांकडे परतण्याचे सगळे रस्तेच बंद झाले. त्यात पोलिसांकडून मारहाण होईल या भीतीपोटी गावकऱ्यांनी या दोघांना गावातच थांबवून ठेवले. मुलांच्या काळजीमुळे आईची होत असलेली घालमेल पायी जाण्याच्या निर्णयाप्रत आली आणि आठ दिवस नजरेआड असलेल्या मुलांची काळजीपोटी या दोघांनी शुक्रवारी रात्री दोन वाजता भूमच्या दिशेने पायपीट सुरू केली.

हमरस्त्यावर पोलीस मारहाण करतील या भीतीने शेत-शिवारातून मार्ग काढीत दोन वर्षांच्या शुभमाला सोबत घेऊन शनिवारी हे दोघे बेंबळी येथे पोहचले, बेंबळीत त्यांनी मुक्काम केला. कोणाला तरी कीव आली दोन भाकरी दिल्या आणि पुढील प्रवास सुरु झाला. रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद शहरातील तेरणा महाविद्यालयाच्या जवळ असलेल्या आडोश्याला शिल्लक ठेवलेल्या एका भाकरीची तिघे मिळून न्याहरी करीत होते. यावेळी कोरोना नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या एका मुख्याध्यापकाने कोणतीही चौकशी न करता केवळ त्यांचा फोटो काढला.

त्यानंतर या दोघांना बोलते करण्याचा प्रयत्न केला असता. सविता पवार यांना भावना अनावर झाल्या. गाडी का बंद केल्या असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आमची मुलं तिकडे उपाशी असतील आम्हाला अडवू नका, असे म्हणत हंबरडा फोडला. दोन दिवसांत दोन पिशव्या आणि मुलाला कडेवर घेऊन या दोघांनी पन्नासहून अधिक किलोमीटरचा पल्ला पार केला आहे. त्यांच्या मुक्कामाचे ठिकाण आणखी ७० किलोमीटर दूर आहे. वाटेत त्यांना कोणी रोखले नाही तर आठ दिवसांपासून नजरेआड असलेल्या मुलांची दोन दिवसात भेट होऊ शकेल. अन्यथा ही जीवघेणी घालमेल आणखी किती दिवस चालणार कोणास ठाऊक अशा शब्दांत बालाजी पवार यांनी आपलं मन मोकळं केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2020 6:08 pm

Web Title: brick worker husband wife start walking to meet their little son in the midnight at 2 am due to fear of police in lock down aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus: मनसेच्या एकमेव आमदाराने मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी, म्हणाले…
2 CoronaVirus : “मोदी सरकारनं टीका करण्यासाठी वेळ ठरवून द्यायला हवी”
3 Coronavirus: …आणि त्या तरुणामुळे कल्याण-डोंबिवलीच्या महापौरच १४ दिवसांसाठी झाल्या होम क्वॉरंटाइन
Just Now!
X