लग्नासाठी आपल्या जाती-समुदायातील मुलीच मिळत नसल्यामुळे कर्नाटकातून मुली विकत आणण्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्हय़ात नुकताच उघड झाला आहे. अशा एका टोळीला सांगली पोलिसांनी नुकतेच पकडल्यावर त्यांनी ९ मुलींचे सौदे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.  जिल्हय़ातील एका समाजात उपवर मुलींचे प्रमाण अत्यल्प आहे. मुला-मुलींच्या व्यस्त प्रमाणामुळे वयाची चाळिशी गाठली, तरी या समाजातील तरुणांचे विवाह ठरणे दुरापास्त झाले आहे. तसेच या समाजातील उपवर मुली शेतकरी मुलांच्या स्थळास नकार देतात. यामुळे या समाजातील मुलांच्या लग्नाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे या समाजातील वरपित्यांनी आता वधुसंशोधनासाठी जातीची बंधनेही सौम्य केली आहेत. पण तरीही त्यांना जिल्हय़ात वधू मिळणे दुरापास्त झाले आहे. यावर उपाय म्हणून कर्नाटकातील अन्य एका समाजातील गरीब घरातील उपवर मुलींची खरेदी करण्याकडे आता या वरपित्यांचा कल दिसू लागला आहे. हे काम करण्यासाठीच या भागात गेल्या काही दिवसांपासून टोळय़ा कार्यरत झाल्या आहेत. यातील एक टोळी पोलिसांच्या हाती नुकतीच लागली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा सारा मुली विक्रीचा प्रकार समोर आला आहे.
सांगलीचे अप्पर अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांनी मिरजेतील एका लॉजवर नुकताच छापा टाकला. या वेळी त्यांनी अशा प्रकारे विक्रीसाठी आणलेल्या मुलींसह काही दलालांना ताब्यात घेतले. यातील दलाल असलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. यांच्याकडे अधिक चौकशी केल्यावर या दलालामार्फत सांगली, कोल्हापूर जिल्ह्य़ात आतापर्यंत ९ मुलींची विक्री करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

प्रकार काय?
मुली खरेदी-विक्री करणाऱ्या दलालांकडून आजवर मिरज तालुक्यातील खंडेराजुरी, मालगाव, आरग, कारंदवाडी, नांद्रे, भोसे आदी गावांत या उपवर मुली पुरविण्यात आल्याचे कळते. कर्नाटकातील हुबळी, हावेरी या जिल्हय़ातील गरीब कुटुंबातील मुली सांगली जिल्हय़ात आणण्यात आल्या आहेत. मुलींसाठी ६० हजार रुपयांपासून लाखापर्यंतची रक्कम वरपित्याने मोजली आहे. तथापि भिन्न संस्कृती, भाषा यामुळे यातील काही मुली पुन्हा परागंदा झाल्याचेही उघड झाले आहे. जिथे या लग्नाचीच नोंद नाही तिथे या तक्रारी दाखल करण्यातही अनेक वरपित्यांना अडचणी येत आहेत.