नवरीच्या भावाला करोना झाल्याने ऐन लग्नात गोंधळ; सोलापूरजवळील घटना

अक्कलकोट तालुक्यातील हंजगी या गावी लग्नासाठी आलेल्या कर्नाटकातील नवरीच्या भावाला करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. त्यानंतर गोंधळलेल्या वातावरणात नवरा-नवरीसह वऱ्हाडातील १९ जणांना ताब्यात घेऊ न सर्वाची रवानगी संस्थात्मक विलगीकरण कक्षात करणे प्रशासनाला भाग पडले.

नवरीचे कुटुंबीय उदरनिर्वाहासाठी पूर्वी मुंबईत राहायचे. टाळेबंदीमुळे हे कुटुंबीय कर्नाटकात गावी परतले होते. त्या वेळी संपूर्ण कुटुंबीयांना गृह विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले होते. १४ ते २९ मे या कालावधीत १४ दिवसांचे गृह विलगीकरण पूर्ण होत असतानाच त्या कुटुंबातील सदस्यांची करोनाशी संबंधित चाचणी घेण्यात आली होती. त्यांचे अहवाल येण्याची वाट न पाहताच या कुटुंबाने ठरल्याप्रमाणे मुलीचा विवाह उरकला. दरम्यान, इकडे विवाह होत असताना तिकडे कर्नाटक प्रशासनाकडे संबंधित कुटुंबीयांच्या सदस्यांचे करोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यात एका तरुणाला करोनाबाधा झाल्याचे उघड झाले. तेव्हा प्रशासकीय यंत्रणा त्या तरुणाच्या गावी पोहोचली. त्या वेळी संबंधित तरुणासह त्याचे संपूर्ण कुटुंबीय व मोजके नातेवाईक त्याच्या बहिणीच्या विवाहासाठी अक्कलकोटला गेल्याचे त्यांना समजले. त्यानुसार कर्नाटक प्रशासनाची यंत्रणा अक्कलकोट तालुक्यात पोहोचली. दरम्यान, ही सर्व मंडळी तोवर विवाह उरकून दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथे गेल्याचे सांगितले गेले. त्यामुळे कर्नाटक प्रशासकीय यंत्रणा पुन्हा तेथून तेलगाव येथे पोहोचली. येथे संबंधित करोनाबाधित तरुणाचा शोध लागला.

नक्की झाले काय?

सोलापूरपासून जवळच असलेल्या कर्नाटक हद्दीतील इंडी (जि. विजापूर) तालुक्यातील कबनिंबर्गी येथील एका तरुणीचा विवाह अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथील एका तरुणाबरोबर ठरला होता. त्यानुसार कर्नाटकातील नवरीच्या कुटुंबीयांसह मर्यादित संख्येने वऱ्हाड आले होते. अतिशय साध्या पद्धतीने विवाह सोहळा उरकला गेला. नंतर नवरीकडचे वऱ्हाड दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथे पाहुण्याच्या घरी उतरले. तथापि, कर्नाटक प्रशासनाची यंत्रणा तेथे धडकली आणि नवरीच्या भावाला ताब्यात घेतले. कारण तो करोनाबाधित होता.