|| नितीन बोंबाडे

नव्या पुलांचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पडून:- डहाणू-धुंदलवाडी राज्यमार्गावरील आंबेसरी येथे मंगळवारी  पूल कोसळल्याची घटना घडल्यानंतर डहाणू-नाशिक, डहाणू-धुंदलवाडी, डहाणू-चिंचणी-वाणगाव दरम्यानचा मुख्य राज्यमार्ग, तसेच जिल्हामार्गावरील पूल सध्या जीर्णावस्थेत आहेत.

सरावली, आशागड, गंजाड, वधना, रानशेत, सारणी, चारोटी, राज्यमार्गावर सरावली, गंजाड या महतत्त्वाच्या जीर्ण पुलाचे स्थापत्यविषयक परीक्षण होऊन मुदत संपली आहे. यात अवजड वाहनांची वाहतूक होत असलेल्या  पुलांचा प्रश्न गंभीर बनला आहे.

डहाणू-नाशिक राज्यमार्गावरील  डहाणू पूर्वेकडील गावांना जोडणारा  सरावली खाडीवरील पुल, गंजाड वळणाचे कठडे मोडकळीस आले  आहेत. या भागात अपघात घडण्याची शक्यता आहे. गंजाड, तसेच  गंजाड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तीव्र वळणावर संरक्षक कठडा तुटलेला आहे. त्यामुळे या पुलावरून वाहन थेट दरीत कोसळण्याचा धोका आहे. तर सरावली नदीवरील संरक्षक कठडे तुटले आहेत. या पुलाच्या तारा बाहेर निघाल्या आहेत. सारणी येथे राज्यमार्ग ओलांडून पलीकडे जाणारा पाटाजवळ तीव्र   वळण आहे. ते वळण कमी करण्याची गरज आहे. तीव्र वळणामुळे वाहन थेट दरीत कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे या तीनही धोकादायक ठिकाणे मृत्यूचा सापळा ठरला आहे.

वधना नदीवरील पुलामुळे  डहाणू -नाशिक राज्यमार्ग जोडलेला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून डहाणूकडे वाहतूक जोडण्यासाठी वधना पूल हाच एकमेव पर्याय आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन वधना  पात्रावर दगडी पूल बांधले. गेली ३० वर्षांहून अधिक काळ या पुलाने वाणगाव – चिंचणी, डहाणू, बोर्डी रस्त्यावरील वाहतूक तसेच चिंचणी, डहाणू किनारपट्टी, वाणगाव, बोर्डी, डहाणू नगर परिषद,  रानशेत, खोऱ्यातील  गावातील वाहतुकीचा भार वाहत आहे, मात्र या पुलाचे खांब जीर्ण झाले आहेत.

हा पूल कमकुवत झाल्याचे निवृत्त बांधकाम अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे ३०  वर्षांपूर्वीचे बांधकाम भार पेलू शकेल का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

आंबेसरी येथून धुंदलवाडी हे भूकंपप्रवण क्षेत्र १० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सातत्याने हादऱ्यांमुळे पूल कमकुवत झाल्याने पूल कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र भूकंपांमुळे पुलाचे सांधे ढिले होण्याची शक्यता असते. परंतु तो कोसळू शकत नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता धनंजय जाधव यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे दोन्ही सांधे कमकुवत होऊन अतिभार झाल्याने पूल कोसळल्याचे जाधव यांनी सांगितले.