परतीच्या पावसाने मुंबईसह कोकण आणि मराठवाड्याला झोडपून काढले आहे. कोकणातील पावसाने गोवा-मुंबई महामार्गावरील वाहतूकीला फटका बसला आहे. कोकणात दरडी कोसळण्याचा प्रकार सुरु असताना आता मराठवाड्यातील लातूरमध्ये सततच्या पावसाने जाना नदीवरील पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे. लातूरमधील बामणी या गावचा पूल सततच्या पावसामुळे वाहून गेला. जमीनीपासून साधारण ७० फूट उंचीवर असणाऱ्या पूलावरुन सध्या पाणी वाहताना दिसत आहे. पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. हा पूल वाहून गेल्याचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे. बामणी गावातील बहुतांशी शेतकऱ्यांची शेती जाना नदीच्या पलीकडे आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता वळसा घालून म्हणजे अधिक अंतर कापून शेतामध्ये जाण्याची वेळ आली आहे.

पाण्यासाठी पायपीट लातूरला परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. लातूर जिल्हय़ात सर्वदूर पाऊस होत असून या पावसाने पाण्याचे विघ्न टळले. जिल्हय़ात तीन दिवसांच्या पावसाने निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी, आदी तालुक्यांतील जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. भर पावसाळय़ात पाणीटंचाईशी सामना करणाऱ्या गावकऱ्यांना पावसाने बेजार करून सोडले. सलग दोन दिवस निलंगा, शिरूर अनंतपाळ व औसा या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे हजारो एकर जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे.