शासनाच्या तिजोरीत ठणठणाट असल्याने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वगृहातील बाबुपेठ, दाताळा व हडस्ती या तीन पुलांची कामे रखडली आहेत. यातही वर्धा नदीवरील हडस्ती येथील पूल पूर्ण झाला असला तरी जोडरस्त्याअभावी सुरू झालेला नाही. तर बाबुपेठ व दाताळा पुलांचे नकाशे मंजूर असले तरी निधीची अडचण आहे.
राज्यातील आघाडी सरकारच्या कार्यकाळात या जिल्हय़ात पठाणपुरा गेटबाहेर वर्धा नदीच्या पुलावर राजुरा-चंद्रपूर या दोन तालुक्यांना जोडणारा अर्धा किलोमीटर लांबीचा पूल बांधून तयार झाला. राजुरा, कोरपना तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयाला येण्यासाठी ३३ कोटी खर्चून हडस्ती-कढोली येथे या पुलाची निर्मिती केली आहे. या पुलामुळे राजुरा तालुक्यातील कढोली, कोलगाव, मानोली, बाबपूर, गोवरी, पोवनी, भोयगाव, साखरी, वाघोबा, निमणी, चिंचोली, कळपना, पेल्लोरा, चार्ली, निर्ली, कुर्ली, मार्डा, किनबोडी, धिडसी, आर्वी, चंदनवाही, पाचगाव, आणि कोरपना तालुक्यातील वरोरा, नांदगाव, हिरापूर, बाखर्डी, कोराडी, कवठाळा, धिडसी, आर्वी, चंदनवाही, पाचगाव ही गावे जोडली जाणार आहेत. दोन वर्षांपूर्वी हा पूल तयार झाला असला तरी जोडरस्त्याअभावी अजूनही सुरू झालेला नाही.
या जोडरस्त्यासाठी १३ कोटींचा निधी आवश्यक आहे. पूल तातडीने सुरू करावा अशी मागणी या परिसरातील गावकऱ्यांनी लावून धरली आहे. चंद्रपूर जिल्हा शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांनी थेट अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दुर्लक्षामुळेच या पुलाचे काम थंडय़ा बस्त्यात असल्याचा आरोप केला आहे. बामणी-बल्लारपूर-वरोरा या रस्त्यासाठी विसापूर येथे पथकर नाका उभारण्यात आलेला आहे. हडस्ती पूल सुरू केला तर पथकर वाचविण्यासाठी प्रवासी बामणी-बल्लारपूर-वरोरा या मार्गाने जाणार नाहीत. त्यामुळेच हडस्ती पूल सुरू केला जात नाही, असाही आरोप नागरकर यांनी केला आहे.
बाबुपेठ उड्डाणपुलाची मागणी कित्येक वर्षांपासून अपूर्ण आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात केंद्रीय खते व रसायन मंत्री हंसराज अहीर व आमदार नाना शामकुळे यांनी ५० लाखांचा धनादेश रेल्वे विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्याची प्रसिध्द माध्यमात करून घेतली. त्याच मुद्दय़ावर बाबुपेठ परिसरातील मते शामकुळे यांनी मिळवली. आता विजयी होताच अहीर-शामकुळे यांना या पुलाचा विसर पडला आहे. विशेष म्हणजे भाजप व विहिंपच्या एका नेत्याने येथील जागेवर अतिक्रमण करून ठेवले आहे. तसेच या पुलासाठी परिसरातील ६४ घरे पाडावी लागणार आहे. त्यासाठीच भाजपचे स्थानिक नेते व मंत्री या पुलाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे. ही वस्तुस्थिती असली तरी केवळ निधी अभावीच या पुलाचे कामकाज किमान दीड वष्रे तरी सुरू होऊ शकणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. दाताळा पूलाचे कामही निधीसाठी रखडले आहे. दाताळा मार्गावर इरई नदीवर पूलाचा नकाशा सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केलेला आहे. या पुलाचा उतार वैष्णवी अपार्टमेंट समोरील चौका पर्यंत येणार आहे. तर दाताळाच्या दिशेने चंद्रलोक लॉन पर्यंत हा उतार राहणार आहे.
पाच कोटीच्या निधीतून या पूलाची निर्मिती केली जाणार आहे. मात्र या पुलाची ही स्थिती निधीअभावी जैसे थे आहे. शासनाच्या तिजोरीत जोवर पैसा येणार नाही तोपर्यंत तरी या पुलाचे काम होणार नाही अशीही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता संदीप यासलवार हा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला बाबुपेठ उड्डाणपुलाच्या मागणीसाठी बागला चौकातील मनोऱ्यावर चढून बसला होता. केंद्रीय खते व रसायन मंत्री हंसराज अहीर यांनी घटनास्थळी भेट देऊन संपर्क साधल्यानंतरही हा युवक खाली उतरण्यास तयार नव्हता. बाबुपेठ उड्डाणपुलाचा प्रश्न गेल्या अनेक वषार्ंपासून रेंगाळलेला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार नाना शामकुळे व हंसराज अहीर यांनी रेल्वेला पुलाच्या काही रकमेचा धनादेश सुपूर्द केला. आता लवकरच काम सुरू होईल असे सांगितले. मात्र, अजूनही काम सुरू झाले नाही. स्थानिक राजकारणी बाबुपेठवासीयांना मूर्ख बनवित आहेत. विहिंप व भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे अतिक्रमण वाचविण्यासाठीच या पुलाचे बांधकाम केले जात नसल्याचा आरोपही यासलवार यांनी केला आहे.