छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा देणाऱ्या आणि ब्रिटिशांच्या येथील वास्तव्याच्या पाऊलखुणा सांगणाऱ्या येथील ब्रिटिशकालीन वखारीचा जागा हस्तांतरण वाद अद्यापही संपलेला नाही. पोलीस दलाकडून आवश्यक असलेले ना हरकत दाखला न मिळाल्याने नव्याने जागा ताब्यात घेण्याच्या नगर परिषदेच्या प्रयत्नांना चांगलीच खीळ बसली आहे. अशा स्थितीतही नगर परिषदेकडून जागा ताब्यात घेण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
राजापूर शहरामध्ये ब्रिटिशांच्या वास्तव्याचा दाखला देणाऱ्या अनेक वास्तू आहेत. त्यामध्ये खडपेवाडी भागामध्ये अनेक वर्षांपूर्वी वखारीची इमारत होती. त्या काळातील राजापूरच्या व्यवहारावर देखरेख ठेवण्यासाठी या इमारतीचा ब्रिटिशांकडून उपयोग केला जात होता. पुरातन जीर्ण स्वरूपाची ही इमारत ठिकठिकाणी ढासळल्याने डागडुजीच्या प्रतीक्षेत होती. पुरातन ठेवा म्हणून या इमारतीची डागडुजी होण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाने काही वर्षांपूर्वी ही इमारत कोसळली होती.
मात्र, तरीही ब्रिटिशांच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा सांगणाऱ्या काही खाणाखुणा या ठिकाणी पहावयास मिळतात. या पाऊलखुणांचा पर्यटनदृष्टय़ा विकास केल्यास शहराच्या सौंदर्यामध्ये एकप्रकारे भर पडणार आहे. त्यामुळे या जागा विकसित करण्याची मागणी लोकांकडून केली जात आहे. हाच धागा पकडून जिल्ह्य़ाचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी वखारीच्या जागेमध्ये भव्य शिवसृष्टी उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे.
वखारीची जागा शहरामध्ये येत असली तरी, त्या जागेवर नगरपालिकेची सद्य:स्थितीमध्ये मालकी नाही. या जागेच्या सातबारा दप्तरी पोलीस दलाची नोंद झालेली आहे. त्यामुळे या जागेचा विकास करण्यासाठी पोलीस दलाचा ना हरकत दाखला मिळणे महत्त्वाचे आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पोलीस दलाकडून या जागेच्या विकासासाठी आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र नगर परिषदेला दिले जात नाही. त्यामुळे ही जागा विकासापासून काहीशी दूर राहिलेली आहे. मात्र, प्रत्यक्षात पालकमंत्री वायकर यांनीच या जागेच्या सुशोभीकरणाचा मानस व्यक्त केल्याने साऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. या जागेचा सुशोभीकरण करण्याच्या अनुषंगाने नगर परिषदेने पोलीस दलाकडे ना हरकत दाखला मिळण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी प्रस्ताव सादर केला होता. मात्र, त्याला अद्यापही पोलीस दलाकडून कोणतेही प्रत्युत्तर आलेले नाही. अशा स्थितीमध्ये वखारीच्या जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव तसाच धूळ खात पडून राहिलेला आहे. अशा स्थितीमध्ये वखारीच्या जागा हस्तांतरणासाठी आवश्यक असलेला ना हरकत दाखला मिळून या जागेचे सुशोभीकरण होणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.