बहीण-भावाच्या नात्याला समृद्ध करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. पण, याच सणाच्या दिवशी चिमुकल्या बहीण-भावाला काळाने हिरावून नेले. नाल्याजवळ खेळत असताना या भावंडाचा तोल गेला आणि नाल्यात बुडून दोघेही मरण पावले. लातूर जिल्ह्यातील निटूर गावात ही घटना घडली.

निटूरमध्ये ग्रामपंचायतीने गावाच्या बाजूला जवळपास दहा फूट खोल नाली तयार केली आहे. पाऊस झाल्याने या नाल्यात पाणी साचलेले होते. दरम्यान, रक्षाबंधनाच्या दिवशी, गुरूवारी दुपारी सदानंद मठाजवळ सात वर्षांची जोया फकीर आणि पाच वर्षाचा आदिल फकीर ही दोन्ही बहीण-भाऊ नाल्याच्या जवळ खेळत होते. खेळत असताना दोघेही तोल जाऊन नाल्यात पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी दोघांचे मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयात आणून ठेवले. ग्रामपंचायतीने केलेल्या हलगर्जीपणामुळेच दोघांचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे गुत्तेदार आणि सरपंचाविरूद्ध गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. पोलिसांनी गावात धाव घेत नातेवाईकाची समजूत काढली. दरम्यान, दोघांच्या मृत्यूमुळे निटूर गावावर शोककळा पसरली आहे.