बहिणीने कुटुंबीयांच्या इच्छेविरोधात परजातीत प्रेमविवाह केल्याचा राग डोक्यात धरून दोन भावांनी आपल्या सख्या बहिणीचा आणि तिच्या नवऱ्याचा खून केल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही भावांना आणि त्यांच्या एका मित्राला घटनेनंतर पाच तासांत अटक केली. गणेश आणि जयदीप पाटील अशी या दोन भावांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघा पाटील (वय २२, रा. थेरगाव, ता. पन्हाळा) हिने काही महिन्यांपूर्वी बंटी ऊर्फ इंद्रजित श्रीकांत कुलकर्णी (वय २३, रा. बच्चे सावर्डे, ता. पन्हाळा) याच्याशी प्रेमविवाह केला. हा प्रेमविवाह पाटील कुटुंबीयांना मान्य नव्हता. त्यामुळे बहिणी आणि तिच्या नवऱ्याविरोधात गणेश आणि जयदीप यांच्या डोक्यात राग होता. त्यातूनच बुधवारी रात्री दहाच्या सुमारास हे दोघेही तिच्या घरी गेले. त्यांनी तिला चहा करण्यास सांगितले आणि त्याचवेळी स्वतःकडील चाकून तिच्यावर सपासप वार केले. तिचा नवरा इंद्रजितने या दोघांनाही थांबविण्याचा प्रयत्न केल्यावर त्याच्यावरही या दोघांनी वार केले आणि ते तेथून पसार झाले. ही घटना घडत असताना त्यांचा मित्र तिथेच खाली उभा होता. कुलकर्णी यांच्या नातेवाईकांनी मेघा आणि इंद्रजितला रुग्णालयात दाखल केले. पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. यानंतर कोल्हापूर पोलिसांनी वेगाने हालचाल करीत गणेश, जयदीप आणि त्यांचा मित्र अशा तिघांना रात्री तीनच्या सुमारास ताब्यात घेतले.
मेघा आणि इंद्रजितमध्ये शाळेत असल्यापासून प्रेमसंबंध होते. त्या दोघांनी काही महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ते दोघेही कसबा बावडा येथे राहात होते. मेघा ही डी मार्टमध्ये तर इंद्रजित एका मेडिकल स्टोअर्समध्ये काम करत होता. या प्रकरणी कोल्हापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.