सार्वजनिक क्षेत्रात दूरसंपर्क कंपनी लँडलाइन सेवेतून पहिल्यांदा बाजारात आली, तरी सरकारी कामकाज पद्धतीने खासगी मोबाइल कंपन्यांच्या स्पध्रेत मागे पडली. काही वर्षांत बीएसएनएलच्या विस्कळीत सेवेमुळे पूर्वी प्रतिष्ठेचा ठरलेला लँडलाइन इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आला. अशा स्थितीत बीएसएनएलने आपली सेवा सुधारण्यासाठी पुन्हा अद्ययावत यंत्रसामग्री उभारून नव्या सेवा सुरू करून ग्राहकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केला. परिणामी ब्रॉडबँड सेवेने लँडलाइनला संजीवनीच मिळाली. नवीन मनोऱ्याची वीज खंडित झाली, तरी बॅकअप व डाटा सर्किटमुळे काही दिवसांतच वीस हजारांच्या संख्येने वाढ झाल्याने बीएसएनएलला ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसते.
बीडसह सर्वत्र दूरसंपर्क विभागाने लँडलाइनच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रात पाऊल ठेवले. घरोघरी लँडलाइन दूरध्वनी देऊन भारत दूरसंपर्कने क्रांती केली. लँडलाइन एकेकाळी प्रतिष्ठेचा झाला. मात्र, खासगी मोबाइल कंपन्यांचे आगमन झाल्यानंतर भारत दूरसंपर्कची एकाधिकारशाही मोडीत निघून खासगी कंपन्यांनी बाजारपेठ व्यापून टाकली. आकर्षक जाहिरातबाजी, कमी दराचे प्लॅन, उत्कृष्ट सेवा यामुळे मूळ बीएसएनएलचा असलेला ग्राहक खासगी कंपन्यांकडे वळला. बीएसएनएलची सेवा सरकारी कामकाजाच्या पद्धतीने धिम्या गतीने मिळत असल्याने ग्राहकांनी खासगी कंपन्यांना प्राधान्य दिले. काही वर्षांतील बीएसएनएलच्या कायम व्यस्त आणि संपर्क क्षेत्राबाहेर या बाबींमुळे मोबाइलचा ग्राहक मोठय़ा प्रमाणात कमी झाला. जिल्हास्तरावर असलेल्या सेवेसाठी अद्ययावत यंत्रसामग्री, वीज खंडित झाल्यानंतर बॅकअप नसल्याने, दूरसंपर्कच्या मोबाइलची सेवा कायम विस्कळीत राहिली. ग्राहकही त्रस्त झाल्याने याचा फटका दूरसंपर्कला बसला. एकूण स्थिती लक्षात घेऊन दूरसंपर्कने आता नवीन योजना व दर्जेदार सेवा देण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात बीएसएनएलचे १८३ मनोरे असून नव्याने १७ उभारण्यात येत आहेत. ब्रॉडबँड सेवा सुरू केल्याने मागील काही दिवसांत लँडलाइनचे ग्राहक वाढले आहेत. मोबाइल सेवेत २० हजारांनी वाढ झाली असून, सध्या १ लाख ९० हजार ग्राहकसंख्या आहे. बीड शहरात १, आष्टी, गेवराई, धारूर, परळी प्रत्येकी १, अंबाजोगाई २, तर आष्टी, शिरूर व कडा या ठिकाणी एक थ्री जी मनोरा उभारण्यात येत आहे. केज तालुक्यातही थ्री जीची मागणी वाढल्याने याही तालुक्यात प्रस्ताव आहे. रात्री ९ ते सकाळी ७ लँडलाइनवरून मोफत कॉलिंग सुविधा केल्याने ५०पेक्षा अधिक ग्राहकांनी लँडलाइन सुविधेची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. वीज खंडित झाल्यास सेवा विस्कळीत होऊ नये, यासाठी आधुनिक बॅकअप सिस्टीमही उभारली आहे. यामुळे बीएसएनएलला ‘अच्छे दिन’ आल्याचा अनुभव यंत्रणा घेत आहे.
चांगली सेवा देण्याचा प्रयत्न- मुंडे
बीएसएनएलकडून ग्राहकांना चांगली व अखंडित सेवा देण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री उभारण्यात येत असून तक्रारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दूर केल्या जातात. आकर्षक योजनांमुळे ग्राहक पुन्हा बीएसएनएलकडे मोठय़ा प्रमाणात आकर्षति होत असल्याचे उपमहाप्रबंधक टी. डी. मुंडे यांनी सांगितले.