शहरात गेल्या ४ दिवसांपासून बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाली असून बँकेशी संबंधित ग्राहकांसह इतरांनाही याचा मोठा फटका बसला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या नावावर बँकेत टाकण्यात येणाऱ्या निधीवाटप कामालाही यामुळे ब्रेक लागला आहे.
जिल्हाभर बीएसएनएलचे जाळे पसरले असून शासकीय, निमशासकीय कार्यालयांतही बीएसएनएल सेवेचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. मात्र, गेल्या ४ दिवसांपासून बीएसएनएलची सेवा मोठय़ा प्रमाणात विस्कळीत झाल्याने ग्राहकांसोबतच बँक आणि शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. बीएसएनएल सेवा कधी सुरळीत होणार, असा प्रश्न या विभागातील अधिकाऱ्यांना केला असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्यामुळे ग्राहकांत संतापाचे वातावरण आहे.
िहगोली शहरात बीएसएनएलची सेवा विस्कळीत होण्याचे प्रकार ग्राहकांसाठी नवीन नाहीत. कधी नगरपालिकेचे खोदकाम, तर कधी बीएसएनएलच्या केबल तुटल्याने ही सेवा सतत बंद पडते. मंगळवार व बुधवार या दोन दिवसांत जिल्ह्यातील इंटरनेट बंद असल्याने बँकेचे व्यवहारही ठप्प झाले होते. अन्य कार्यालयांतील ऑनलाईन कामकाज बंद झाल्याने नागरिकांची गरसोय झाली. शहरातील जलवाहिनी टाकण्याचे काम गेल्या २-३ वर्षांंपासून चालू असल्याने त्याचाही फटका ही सेवा विस्कळीत होण्यास कारण ठरते. बीएसएनएलची केबल तुटल्याप्रकरणी पालिकेला यापूर्वी ८ लाख रुपये भरण्याची नोटीसही बजावण्यात आली होती. विशेष म्हणजे खोदकाम चालू असताना या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तेथे थांबणे आवश्यक असल्याचे पालिका प्रशासनाकडून वारंवार सूचित केले जाते. परंतु कर्मचारी त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करतात. त्यामुळेच पालिकेने बीएसएनएलची नोटीसही धुडकावून लावली होती.