निवडणुकीत पैसे खाल्ल्याचा आरोप; नेत्यांचे बैठकीतून पलायन

अमरावती : बसपचे महाराष्ट्र प्रभारी प्रमोद रैना, अ‍ॅड. संदीप ताजने यांच्यासह अन्य नेत्यांना बसपच्याच कार्यकर्त्यांनी बैठकीदरम्यान खुर्च्यानी मारहाण केली. येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी दुपारी ही घटना घडली. यामुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष चव्हाटय़ावर आला आहे.  लोकसभा निवडणुकीत नेत्यांनी पैसे घेऊन भाजप-शिवसेनेला मदत केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. संतप्त कार्यकर्त्यांच्या तावडीतून वाचण्यासाठी नेत्यांना जीव मुठीत घेऊन पळ काढावा लागला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आयोजित बैठकीला बसपचे राज्य प्रभारी प्रमोद रैना, अ‍ॅड. संदीप ताजने, प्रदेश सरचिटणीस कृष्णा बेले, प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार, राजू बसवनाथे आदी उपस्थित होते.

बैठक सुरू झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. सर्व कार्यकर्ते प्रामाणिकपणे  पक्षासाठी काम करीत असताना नेते मात्र दलालीत गुंतलेले होते. लोकसभेला नेत्यांनी पैसे घेऊन भाजप-शिवसेनेसाठी काम केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. सहा महिन्यांपूर्वी विधानपरिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत बसपच्या नगरसेवकांनी पैसे घेऊन भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांना मतदान केले. पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांऐवजी धनाढय़ांना तिकीट विकले जाते. या तक्रारीची  दखल घेतली जात नाही, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.

संतप्त कार्यकर्त्यांनी नंतर खुर्च्याची फेकाफेक सुरू केली. गोंधळात नेते बैठकीतून निघून जात असताना कार्यकर्त्यांनी त्यांना खुर्च्यानी मारहाण केली. यात बसपा नेत्यांचे कपडे देखील फाडण्यात आले. कार्यकर्त्यांचा रुद्रावतार पाहून नेत्यांनी अक्षरश: पळून जाऊन स्वत:ची सुटका करून घेतली. यावेळी ‘ताजने हटाव, बीएसपी बचाव’ अशी जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली.

एका कार्यकर्त्यांने फायबरची खुर्ची थेट मंचाच्या दिशेने भिरकावली. संतप्त कार्यकर्त्यांनी सभागृहातील खुर्च्याची मोडतोड केली. मंचावरील टेबल फेकून दिले. नेते बैठकीतून निघून जात असताना कार्यकर्ते त्यांच्या मागेही धावले. नेते निघून गेल्यानंतरही बराच काळ घोषणाबाजी सुरू होती.

सोमवारी विश्रामगृहावर कार्यकर्ता बैठकीचे आयोजन केले होते. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त होत्या. मते-मतांतरे व्यक्त झाली. काहींनी निवडणुकीतील पराभवाविषयी चिंतन करण्याचा सल्ला दिला. काही लोकांनी खुर्च्या फेकल्या, पण नेत्यांना मारहाण झाली नाही. पक्षातील ही अंतर्गत बाब आहे.

– चेतन पवार,  प्रदेश उपाध्यक्ष, बसप.