यंदा उत्पादन घटण्याची चिन्हे

जनुकबदल पद्धतीने तयार केलेल्या बियाणांचे नवे तंत्रज्ञान कपाशीच्या पिकामध्ये आणण्यास घातलेल्या बंदीमुळे आता नुकसान होऊन बोंडआळीचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. बी.टी. कपाशीला पर्याय म्हणून देशी वाण विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप ते व्यापारी तत्त्वावर लागवडीसाठी खुले झालेले नाही. बी.टी.ची उपयुक्ततता संपल्याने ‘मोन्सॅन्टो’ या कंपनीला दिली जाणारी रॉयल्टी बंद करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

राज्यात बी.टी. कपाशीचे पीक ४८ लाख हेक्टरवर उभे आहे. मात्र मराठवाडा व विदर्भात मोठय़ा क्षेत्रावर यंदा मावा, तुडतुडे, पांढरी माशी यांच्या पाठोपाठ गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. तसा अहवाल वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. तिवारी यांच्या अहवालामुळे शेती क्षेत्रातील तज्ञांमध्ये बी.टी कपाशीच्या तंत्रज्ञानाबद्दल मतभिन्नता आहे.

मोन्सॅन्टो या कंपनीने कपाशीच्या पिकात सर्वप्रथम जनुकबदल बियाणाचे तंत्रज्ञान जगात आणले. १९९१ मध्ये या कंपनीला देशात परवानगी देण्यात आली. बोंडआळी संरक्षक क्रायवन ए.सी. (बोलगार्ड १) हा जीन त्यांनी कपाशीच्या वाणात टाकला. महिकोच्या माध्यमातून मोन्सॅन्टोला २००१ पासून व्यापारी तत्त्वावर त्याच्या लागवडीला परवानगी देण्यात आली. २००१ ते २००८ पर्यंत हे बियाणे चालले. त्यानंतर २००८ साली क्रायवन ए.बी. हे जनुक त्यांनी कपाशीत टाकले. बोलगार्ड २ हे बी.टी बियाणे ओळखले जाते. पूर्वी कपाशीवर बोंडआळीचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होऊन आळी पीकच फस्त करीत असत. पण बी.टी. तंत्रज्ञानामुळे ते थांबले. आज ९८ टक्के क्षेत्रावर बी.टी. कापूस घेतला जातो. १०० कंपन्यांनी अनेक नामांकित वाण या माध्यमातून आणले आहे. कपाशीच्या झाडात जास्त प्रमाणात प्रोटीनची निर्मिती झाल्यामुळे बोंडआळी प्रादुर्भाव होत नाही. मावा, तुडतुडे या करिता साधी कीटकनाशक औषधे वापरले तरी रोग आटोक्यात येत होता. पण २०१५ पासून मात्र बोंडआळीचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. आता तो दिवसेंदिवस वाढू लागला आहे.

मोन्सॅन्टो या कंपनीने आता ऑस्ट्रेलियासह अन्य काही प्रगत देशात बी.टी. कपाशीचे पुढील अत्यंत प्रगत असे तंत्रज्ञान आणले आहे. राऊंडअप रेडी हे तणरोधक, दुष्काळ रोधक तसेच बोलगार्ड ८ हे बी.टी. बियाणे आणले. मात्र जनुकबदल बियाणांच्या चाचण्यांना देशात विरोध सुरु झाला. त्यामुळे आता मोन्सॅन्टोने नवीन बी.टी तंत्रज्ञानासाठी अर्ज केलेला नाही. दर ८ वर्षांनी बी.टी.चे नवे तंत्रज्ञान येऊ दिले असते तर गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव झाला नसता असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बी.टी. कपाशीच्या बियाणाच्या दरावरही सरकारने नियंत्रण आणले. त्यामुळे दर कमी झाले. रॉयल्टीची रक्कम कमी केल्याने तंत्रज्ञान देण्यास आता मोन्सॅन्टो फारसे अनुकूल नाही.

बोंडआळीला बी.टी. कपाशी प्रतिकार करीत नसल्याने आता मोन्सॅन्टोला रॉयल्टी देऊ नये अशी मागणी केली जात आहे. मोन्सॅन्टोच्या भूमिकेनंतर भारतीय कृषी अनुसंधान परिषद व नागपूर येथील राष्ट्रीय कापूस शोध संशोधन संस्थेने देशातील विविध कृषी विद्यापीठांमध्ये देशी कापसावर संशोधन सुरू केले आहे. मात्र हे संशोधन अंतिम टप्यात असले तरी अद्याप शेतकऱ्यांना लागवडीसाठी देण्यात आले नाही. महाबिजने राज्यातील चार कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून बियाणे निर्मिती सुरू केली आहे. पण अद्याप देशी बियाणे लोकप्रिय झालेले नाही. सुधारित वाण शेतकऱ्यांना मिळालेले नाही. एका बाजूला देशी वाणही नाही, अन् दुसऱ्या बाजूला नवे तंत्रज्ञानही येऊ दिले जात नसल्याने शेतकरी एका चक्रव्यूहात सापडला आहे.

बोंडआळीची फार मोठी समस्या नाही.

बी.टी. तंत्रज्ञान चांगले काम करीत असून त्यामुळे देशात कपाशीचे विक्रमी उत्पादन झाले. मोन्सॅन्टोला काही र्निबधामुळे बी.जी.3 हे तंत्रज्ञान देशात देता आले नाही. विदर्भ व मराठवाडय़ात बी.टी. कपाशीची परिस्थिती चांगली आहे. जास्त प्रादुर्भाव नाही. बी.टी. कपाशीची लागवड शेतकरी मोठय़ा प्रमाणात करीत असून सुमारे दीड कोटी पाकिटे जास्त विकली गेली. मावा व तुडतुडय़ाकरिता हे तंत्रज्ञान नाही. पण व्यवस्थापन चांगले केले तर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.

– सत्येंद्र सिंग, संचालक, मोन्सॅन्टो.

बी.टी. तंत्रज्ञान उपयुक्त

बी.टी. कपाशीचे तंत्रज्ञान उपयुक्त असून बी.जी.3 ला परवाणगी द्यायला हवी होती. तंत्रज्ञान बदनाम करता कामा नये. पण राजकारणातून काही लोक विरोध करीत आहे. पारंपरिक बियाणांमुळे उत्पादकता वाढलेली नाही. चांगले देशी वाण न देता बी.टी.ला विरोध करून शेतकर्याचे नुकसान केले जात आहे. बियाणांविरुद्धचा वाद निर्थक असून तो बुरसटलेल्या विचारामुळे उभा केला जातो. कृषी संशोधन संस्थांनी चांगले वाण दिले तर शेतकरी बी.टी.कडे कशाला वळतील. विरोध होऊनही हेच तंत्रज्ञान शेतकरी वापरतात.

रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष,  शेतकरी संघटना.

सरकारने धोरण घ्यावे

बी.टी. बियाणांसबंधी सरकारने धोरण जाहीर करण्याची गरज आहे. बियाणेनिर्मिती कंपन्यांना त्यावर योग्य प्रकारे काम करता येईल. बी.टी.बरोबरच देशी वाणाचेही बियाणे आणण्याचे प्रयत्न खासगी क्षेत्रात सुरू आहे.

– विजय चौधरी,

कार्यकारी संचालक, ग्रीनगोल्ड कंपनी