20 September 2020

News Flash

कोल्हापूर बंधाऱ्यांच्या दरवाजाच्या ठिकाणी एक मीटर भिंत बांधणार!

जिल्ह्य़ातील कोल्हापूर बंधाऱ्यांच्या दरवाजांच्या जागी एक मीटर सिमेंट काँक्रीटची भिंत बांधण्याचा प्रस्ताव जलसंधारण विभागाच्या विचाराधीन आहे. दरवाजे बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठे असल्याने या बंधाऱ्यांत पाणीसाठा

| June 12, 2015 01:40 am

जिल्ह्य़ातील कोल्हापूर बंधाऱ्यांच्या दरवाजांच्या जागी एक मीटर सिमेंट काँक्रीटची भिंत बांधण्याचा प्रस्ताव जलसंधारण विभागाच्या विचाराधीन आहे. दरवाजे बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठे असल्याने या बंधाऱ्यांत पाणीसाठा होत नाही. त्यावर उपाय म्हणून हा प्रस्ताव समोर आला आहे. जिल्ह्य़ातील संबंधित प्रशासकीय यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात राज्याच्या जलसंधारण सचिवांशी चर्चा केली.
मराठवाडय़ाच्या आठ जिल्ह्य़ांत कोल्हापूर बंधाऱ्यांची संख्या अडीच ते तीन हजारांदरम्यान आहे. पैकी नादुरुस्त बंधाऱ्यांची संख्या मोठी आहे. जालना जिल्ह्य़ातील नादुरुस्त बंधाऱ्यांची संख्या दोनशेपेक्षा अधिक आहे. पैकी सर्वाधिक १८९ नादुरुस्त बंधारे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील दहा बंधारे राज्य सरकारच्या पाटबंधारे खात्याच्या स्थानिक स्तर विभागाअंतर्गत, तर तीन नादुरुस्त बंधारे लघु पाटबंधारे विभागाचे आहेत.
नादुरुस्त बंधाऱ्यांप्रमाणेच कोल्हापूर बंधाऱ्यांचे दरवाजे बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठे आहे. मराठवाडय़ातील आठ जिल्ह्य़ांत जवळपास १९ हजार दरवाजे बेपत्ता आहेत. त्यामुळे अशा बंधाऱ्यांत पाणीसाठा होत नाही. मराठवाडय़ात पावणेतीन हजारांपेक्षा अधिक कोल्हापूर बंधारे पूर्ण झाले असून, यातील ८० टक्के बंधारे औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद या चार जिल्ह्य़ांतील आहेत. एकूण बेपत्ता बंधाऱ्यांपैकी जवळपास ९० टक्के बेपत्ता दरवाजेही या चार जिल्ह्य़ांतील आहेत. बंधाऱ्यांची दुरुस्ती व नवीन दरवाजे बसविण्यासाठी ६० कोटींपेक्षा अधिक निधीची आवश्यकता संबंधित प्रशासकीय यंत्रणेने व्यक्त केली. हा निधी जिल्हा विकास समितीच्या माध्यमातून मिळविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
या पाश्र्वभूमीवर बेपत्ता दरवाजांच्या जागी नवीन दरवाजे बसविण्याऐवजी तेथे एक मीटर उंचीची काँक्रीटची भिंत बांधण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. कोल्हापूर बंधारा पूर्ण झाल्यावर त्याची देखरेख करणे आणि योग्य वेळी दरवाजे काढणे तसेच बसविण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेने स्थानिक ग्रामस्थांवर टाकलेली असते. त्यासाठी स्थानिक पातळीवर सहकारी संस्थांची स्थापना करणे अपेक्षित असते. परंतु जालन्यासह मराठवाडय़ात अशा सहकारी संस्था स्थापन होण्याचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे कोल्हापूर बंधाऱ्यांच्या देखरेखीचा प्रश्न निर्माण होतो आणि ते बेपत्ता होतात.
काही वर्षांपूर्वी या बंधाऱ्यांचे रूपांतर बॅरेजसमध्ये करून त्यावर स्वयंचलित दरवाजे बसविण्याची सूचना आली होती. परंतु या व्यवस्थेच्या व्यवहार्यतेवरही प्रश्नचिन्ह लावण्यात आले होते. जालना जिल्ह्य़ाच्या ग्रामीण क्षेत्रातील काही पुढाऱ्यांच्या मते पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांवरील कोल्हापूर बंधाऱ्यांवरील दरवाजे काढणे वा टाकण्याच्या वेळेचा विचार मराठवाडय़ातील बंधाऱ्यांसंदर्भात योग्य ठरत नाही. त्या भागात अनेक ठिकाणी ऑक्टोबरमध्ये दरवाजे बसविले जात नाहीत. कारण पश्चिम महाराष्ट्रातील काही नद्या सहा महिन्यांपेक्षा अधिक काळही वाहतात. जालना जिल्हा किंवा मराठवाडय़ातील अन्य जिल्ह्य़ांत गेली अनेक वर्षे अपवादात्मक वर्ष वगळले तर समाधानकारक पाऊस पडत नाही. त्यामुळे मराठवाडय़ातील नद्या एक तर वाहतच नाहीत. वाहिल्या तरी अल्प काळासाठी वाहतात. नादुरुस्ती, दरवाजे बेपत्ता होणे, कमी पाऊस या सर्व स्थितीत मराठवाडय़ातील कोल्हापूर बंधाऱ्यांवर एक मीटर उंचीची सिमेंट काँक्रीटची भिंत बांधण्याचा प्रस्ताव असून, त्यासंदर्भात तांत्रिक बाबी तपासून पाहिल्या जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2015 1:40 am

Web Title: build one meter wall in place of kolhapur barrage door
टॅग Dam,Door,Jalna
Next Stories
1 ‘केंद्र-राज्य सरकारांच्या भूमिकेने निम्मे साखर कारखाने अनिश्चितेत’
2 ‘लातूर पॅटर्न’च्या नावाखाली आता होतेय खुलेआम लूट!
3 महाराष्ट्र शुगर्सने थकवले शेतकऱ्यांचे ४४ कोटी
Just Now!
X