अरबी समु्द्रात नाही तर सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवस्मारक बांधा अशी मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी अरबी समुद्रात शिवस्मारकाची पायाभरणी करण्यासाठी समुद्रात जात असताना एका बोटीला अपघात झाला. या अपघातात सिद्धेश पवार या तरूणाचा मृत्यू झाला. तर २३ जण थोडक्यात बचावले. या घटनेनंतर शिवस्मारक अरबी समुद्रात न होता दुसऱ्या ठिकाणी उभारले जावे अशी मागणी होते आहे.

मराठा सेवासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी तर राजभवनाच्या जागेवर शिवस्मारक बांधा अशी मागणी केली. तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनीही गड-किल्ल्यांवरच महाराजांचे स्मारक बांधले गेले पाहिजे अशी भूमिका याआधी घेतली होती. आता नितेश राणे यांनीही समुद्राऐवजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर हे स्मारक बांधावे अशी मागणी करणार असल्याचे म्हटले आहे.