गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना पुणे न्यायालयाने शुक्रवारी दिलासा देण्यास नकार दिला. न्यायालयाने डीएसके यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे डीएसकेंना आणखी काही दिवस तुरुंगात राहावे लागणार, हे स्पष्ट झाले आहे.

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांना अटक झाली असून कुलकर्णी दाम्पत्य सध्या येरवडा कारागृहात आहे. कुलकर्णी यांच्यावतीने अॅड. श्रीकांत शिवदे यांनी विशेष न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. कुलकर्णी यांना ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी आणखी काही कालावधी द्यावा. व्यवसाय पूर्ववत झाल्यानंतर ते सर्व ठेवीदारांचे पैसे परत करतील, असे बचाव पक्षाच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले होते. तर डीएसके यांना अनेक वेळा मुदत देऊनही त्यांनी ५० कोटी रुपये जमा केले नाही. त्यांनी न्यायालयाची दिशाभूल केली. अशी व्यक्ती जामिनावर तुरुंगाबाहेर आली तर ती पळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता.

शुक्रवारी न्यायाधीश जे टी उत्पात यांच्या न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने डी एस कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांना जामीन देण्यास नकार दिला.