पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा एक्झिटजवळील उतारावर मुंबईच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या एका टँकरने दुभाजक ओलांडून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व पुण्याच्या डीएसके विश्व उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष दीपक सखाराम तथा डी. एस. कुलकर्णी यांच्या मोटारीला जोरदार धडक दिली. या घटनेत मोटारीचा चालक जागीच ठार झाला, तर कुलकर्णी हे गंभीररीत्या जखमी झाले. बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा अपघात झाला.
कुलकर्णी यांना तातडीने निगडीच्या लोकमान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्या डाव्या बाजूच्या बरगडय़ांना दुखापत झाली आहे. नीरज रामकरण सिंग (वय ३७, रा. गणेशनगर बोपखेल) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे. मोटारीत चालकाशेजारी बसलेले किरण काटे हे मात्र अपघातातून सुखरूप बचावले. कुलकर्णी हे त्यांच्या लँड क्रूझर मोटारीने मुंबईहून पुण्याकडे येत असताना हा अपघात झाला. मोटारीत तिघे जण होते. कुलकर्णी हे मागील सीटवर बसले होते. खंडाळा बोगदा पार करून त्यांची मोटार खंडाळा एक्झिटजवळ आली असताना हा भीषण अपघात झाला.
पुण्याकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या एका टँकरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो टँकर रस्ता दुभाजक ओलांडून डीएसके यांच्या मोटारीवर प्रचंड वेगाने आदळला. डीएसकेंच्या चालकाने मोटार वळवून धडक टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र टँकर वेगात असल्याने त्याला यश आले नाही.

महामार्गावर सुरक्षिततेच्या योजनांची कासवगती
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सातत्याने भीषण अपघात होत असताना त्यांना रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत शासनाकडून घातकी कासवगतीची भूमिका घेण्यात येत आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या मोटारीला झालेल्या अपघातामुळे द्रुतगती मार्गावरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.