या शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या व अनेक दिवसांपासून रखडलेल्या नाटय़गृहाचे बांधकाम चार महिन्यात पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभेत या नाटय़ागृहाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी ही ग्वाही दिली.
बुलढाणा शहरात प्रशस्त व भव्य स्वरूपाचे नाटय़गृह असावे, अशी मागणी सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून रेटण्यात आली होती. या मागणीला युती शासनाच्या काळात २ कोटी रुपये खर्चाची मंजुरी देण्यात आली होती. तथापि, २००७ पर्यंत या नाटय़गृहाबाबत कोणतीही प्रगती झाली नाही. ऑगस्ट २००७ मध्ये सुमारे ३ कोटी ११ लाख रुपये सुधारित अंदाजपत्रकीय किंमत असलेल्या नाटय़गृहाच्या बांधकामास तत्वत मंजुरी मिळून कामास प्रत्यक्ष २००८ मध्ये सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ५० टक्के काम पूर्ण झालेले आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात नगरपालिका प्रशासनाकडून नाटय़गृहाच्या बांधकामासाठी मंजूर झालेला निधी इतर प्रयोजनासाठी खर्च झाल्याने तसेच बांधकाम साहित्य व मंजुरीमध्ये झालेली भाववाढ, पाणी टंचाई अशा इतर तांत्रिक कारणांमुळ हे बांधकाम अनेक वर्षांंपासून रखडलेले होते.
या शहराची सांस्कृतिक चळवळीशी जुळलेली नाळ लक्षात घेता आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी हा प्रश्न प्रथम प्राधान्याने मार्गी लावण्याबाबत निवडणुकीनंतर पाठपुरावा सुरू केला होता. दरम्यान, विधीमंडळाच्या गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नाटय़गृहाच्या रखडलेल्या बांधकामाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी हा प्रश्न रेटून धरला होता. त्यामधील तांत्रिक अडचणी लक्षात घेता विधानसभेत तारांकित प्रश्नही उपस्थित केला होता. दरम्यान, शहरातील नाटय़गृहाचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्याबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात येत आहे, या प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी झालेला विलंब मान्य करीत आगामी चार महिन्यात हे काम प्राधान्याने पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा तथापि रखडलेला प्रश्न पूर्णत्वाच्या ऐरणीवर आणल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.