जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर गुरुवारी दुपारी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. नितीन राठोड आणि संजय राजपूत हे दोन जवानही या हल्ल्यात शहीद झाले असून ते मूळचे महाराष्ट्रातील बुलढाण्याचे आहेत.

या दोन्ही जवानांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळगावी बुलढाण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एअर फोर्सच्या विशेष विमानाने या दोन्ही जवानांचे पार्थिव दिल्लीहून औरंगाबाद येथे आणण्यात येणार आहे. औरंगाबाद विमानतळावरुन या दोन्ही वीरपुत्रांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी बुलढाण्यात आणले जाईल.

संजय राजपूत हे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरचे तर नितीन राठोड हे लोणार तालुक्यातील आहेत. महाराष्ट्र सरकारने या दोन जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत जाहीर केली आहे.

संपूर्ण भारत देश या हल्ल्यामुळे उद्विग्न आहे, सगळ्या जनतेच्या मनात या हल्ल्याचा राग आहे. जे जवान या हल्ल्यात शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांनी स्वतःला एकटं समजू नये. सव्वाशे कोटी जनता तुमचं कुटुंब आहे हे लक्षात असूद्या, कोणतीही काळजी करू नका असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. शहीद जवानांचे हौतात्म्य वाया जाणार नाही, या हल्ल्याला आम्ही जशास तसे उत्तर देणार असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.