X
X

वारणाकाठचा थरार! मगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वतःसह वाचवले मालकाचे प्राण

सोशल मीडिया आणि वारणा परिसरात या बैलाचीच चर्चा चांगलीच रंगली आहे

वारणा नदीच्या काठावर आज घडलेला थरार पाहून कुणाच्याही अंगावर काटा आला असता. नेहमीच्या शिरस्त्यानुसा महेश सर्जेराव काटे या २४ वर्षीय शेतकऱ्याने बैलांना वारणा नदीच्या काठावर आणलं. त्यांना पाणी पाजलं, न्हाऊ घातलं. त्यानंतर बैल परतू लागले तोच चार-पाच मगरींनी बैल आणि महेश यांच्यावर हल्ला केला. ही गोष्ट लक्षात येताच बैलाने मगरींच्या हल्ल्याला प्रतिकार केला आणि स्वतःसह मालकाचेही प्राण वाचवले.

पन्हाळा तालुक्यातील सातवे येथे महेश सर्जेराव काटे ( वय २४ ) यांचे शेत आहे. वारणा नदी काठी असलेल्या शेतामध्ये महेश व अन्य शेतकरी काम करीत होते. दुपारच्या सुमारास बैलांना पाणी पाजण्यासाठी महेश यांनी चार बैल पात्रात नेले. बैलांना पाणी पाजले. अंगावर पाणी ओतून त्यांना अंघोळही घातली त्यातील तीन बैल शेतात परतले.

एका बैलाला पाणी पाजले जात असताना तीन मगरींनी महेश यांना तर एका मगरीने बैलावर हल्ला चढवला. एका मगरीने महेश यांच्या डाव्या पायाचा चावा घेतला. मगरीचे तीन दात हाडात आत मध्ये घुसले होते. प्रसंग जीवावर बेतलेला होता. पण याच वेळी बैलाने झुंजार वृत्ती दाखवली. त्यांने प्राणपणाने झुंजत प्रतिकार केला. हल्ला करणाऱ्या मगरींना परतावून लावले. आणि आपल्यासह मालकाचा ही जीव वाचवला. या घटनेनंतर महेश हे जखमी झाले असून त्यांच्यावर वारणा-कोडोली येथील यशवंत धर्मार्थ रुग्णालयात उपचार सुर उपचार करण्यात आले. ही घटना घडल्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी आले होते.

पूर्वी एकदा शेतात काम करीत असताना महेश यांचा एक हात कडबा कुट्टी यंत्रात अडकला होता. त्यामध्ये हाताला मोठी जखम झाली होती. तेव्हाही त्यांच्यावर मोठे संकट उद्भवले होते. त्यानंतर आज पुन्हा संकट आले असताना बैलाने मालकाचे प्राण वाचवल्याने या बैलाची वारणा परिसरात समाज माध्यमात कौतुकाने चर्चा सुरू होती.

 

20
X