रत्नागिरी : शिकारीच्या छंदामुळे सिद्धेश संतोष गुरव (वय १९ वर्षे, रा. मार्गताम्हाणे) या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

या प्रकारानंतर त्या तरुणाचे सहकारी तेथून पळून गेले. गुहागर पोलिस ठाण्यात संध्याकाळी तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दोघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

सिद्धेश मित्रांसोबत बुधवारी मार्गताम्हाणे महावितरण उपकेंद्राजवळील जंगलात शिकारीसाठी गेला होता. देवघर ते मार्गताम्हाणे महावितरण या भागात ते फिरत होते. या भागामध्ये बंदुकीची गोळी लागून सिद्धेश पडून असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने दुरध्वनीवरुन सांगितली. त्या माहितीच्या आधारे गुहागर पोलिसांनी जंगलात शोध सुरु केला. त्यावेळी डाव्या हाताच्या चिंधडय़ा झालेल्या आणि बंदुकीची गोळी डोक्यात शिरलेला मृतदेह त्यांना आढळला.

पोलिसांनी तत्काळ अधिक तपास सुरु करत श्वानपथक घटनास्थळी आणले. पोलिसांनी अग्नेश चव्हाण आणि यश पोतदार या दोन तरुणांनाही संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. शिकारीसाठी झाडावर चढलेल्या सिद्धेशला खालून बंदूक देताना अचानक चाप ओढला गेला. सिध्देशने बंदूक पकडलेला डाव्या हाताच्या चिंधडय़ा करत काडतूस जबडय़ातून आत शिरली असावी आणि  हा प्रकार लक्षात आल्यामुळे घाबरलेल्या  मित्रांनी तेथून पळ काढला असावा, असा अंदाज आहे   महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेला सिध्देश वडिलांना छायाचित्रणाच्या व्यवसायात मदत करत होता.