चीन हा आपला शेजारी देश विविध आघाड्यांवर प्रगती करतो आहे. चीन शेजारी देश असला तरीही तो स्पर्धकही आहे. त्यांनी केलेल्या विकासाची स्पर्धा वेळोवेळी होत असते. चीनमध्ये बुलेट ट्रेन ही दैनंदिन बाब आहे. अशात आपल्याकजडे ती येत असताना या ट्रेनला विरोध होणे दुर्देवी असल्याचे मत डॉ. माधवराव चितळे यांनी व्यक्त केले. औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेनेच्या वतीने माधव चितळे यांना गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचवेळी त्यांनी त्यांचे मनोगत मांडत बुलेट ट्रेनबाबत आपले परखड मत व्यक्त केले.

‘मराठवाड्याच्या भविष्यातील विकासवाटा’ या विषयावर माधवराव चितळे यांनी भाषण दिले. मराठवाड्याने आता मागासलेपण हा शब्द सोडून दिला पाहिजे असेही चितळे यांनी म्हटले आहे. देशभर नामांकित असलेल्या व्हिडिओकॉन, बजाज या औद्योगिक संस्था मराठवाड्यातीलच आहेत. आपल्याकडच्या सामाजिक संघटनांनीही सक्षमपणे काम केले पाहिजे असेही चितळे यांनी स्पष्ट केले.

मराठवाड्यातील प्रश्नांची उकल करताना डॉ. चितळे म्हणाले की, अलीकडे गोदावरीच्या पाणी वाटपावरून अकारण चिंता व्यक्त केली जात आहे. गोदावरीवर अवलंबून असलेला मराठवाड्याचा भाग २० हजार चौरस मिटर एवढा आहे. तर ४४ हजार चौरस मीटर प्रदेश गोदावरीवर अवलंबून नाही. कुंथल प्रदेशात अनेक चांगल्या बाबी आहेत. असं असताना गोदावरीचा पाणी प्रश्न अकारण चिंतेचा विषय बनला आहे. असेही मत त्यांनी व्यक्त केले.