गुजरातमधून सुरू झालेली विक्रमी आवक आणि स्थानिक बाजारात उन्हाळ कांद्याचे वेळेवर झालेले आगमन याची परिणती कांद्याचे भाव घसरण्यात झाली आहे. कांद्याचे सरासरी भाव प्रति क्विंटलला १८५ रुपयांनी घसरले आहेत.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी १७ हजार ८०० क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यात नव्याने उत्पादित होणारा उन्हाळ (गावठी) कांद्याचे प्रमाण ८३० क्विंटल होते. उर्वरित १६ हजार ९९० क्विंटल लाल कांदा होता. त्यात उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटल ८३० तर लाल कांद्याला ७४० रुपये सरासरी भाव मिळाला. पंधरा दिवसांपूर्वी लाल कांद्याचे सरासरी भाव ९२५ रुपये होते. मागील तीन दिवसांपासून लासलगाव बाजार बाजारात कांदा भावात घसरण सुरू आहे. सध्या गुजरातमधून कांद्याची विक्रमी आवक होत आहे. आवक वाढत असताना मागणी नसल्याने कांद्याचा दर घसरल्याचे मत लासलगाव बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. पुणे व नाशिकहूनही नव्या उन्हाळ कांद्याची आवक होत आहे. या कांद्याचे वेळेवर आगमन झाल्यामुळे लाल कांद्याचे भाव कमी झाल्याचे पाटील यांनी नमूद केले.