चंद्रपूर वनवृत्तातील चंद्रपूर, ब्रम्हपुरी व मध्य चांदा या तीन वनविभागांतर्गत येणाऱ्या जंगलालगतच्या २०० गावांमध्ये जलशिवार योजनेंतर्गत गॅब्रियन बंधाऱ्यासह विविध प्रकारचे बंधारे व तलाव दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांना वनातच मुबलक पिण्याचे पाणी मिळाले आहे. जलशिवार योजना शेतकऱ्यांसह वन्यप्राण्यांसाठीही फायदेशीर ठरले आहे.

गेल्या दोन वर्षांत या वनवृत्तात मोठय़ा प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत व इतरही योजनांतर्गत अनेक कामे देण्यात आली असून यात राज्य योजना, जिल्हा नियोजन व विकास समिती व कॅम्पांतर्गत गॅब्रियन बंधारे, कच्चे बंधारे, सिमेंट बंधारे, दगडी बंधारे, वनतलाव, भूमिगत बंधारे, तलाव दुरुस्तीची कामे करण्यात आलेली आहेत. याशिवाय, चालू वर्षांतही जलयुक्त शिवार अंतर्गत मध्य चांदा-६६, चंद्रपूर-६६ ब्रम्हपुरी-६८, अशी एकूण २०० गावे निवडण्यात आली असून त्यात १ हजार १३७ कामांकरिता २६७.८६ लाख रुपये अनुदान प्रस्तावित केलेले आहे. या कामांची अंदाजपत्रके बनवण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी आदींची सहकार्य लाभले असून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. जलयुक्त शिवार योजनेतील बहुतांश कामे ही वनालगतच्या लोकांनी सुचवलेल्या ठिकाणी लोकसहभागातून घेण्यात आल्यामुळे वन्यप्राण्यांना वनातच पिण्याच्या पाण्याची मुलबक सुविधा उपलब्ध झाली आहे, अशी माहिती चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी दिली. जलशिवारच्या माध्यमातून जंगलातच पाणवठे तयार झाल्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षही कमी होण्यास मदत झालेली आहे.