दामदुपटीचे आमिष दाखवून लोकांना गंडविल्याचे हिंगोलीत दुसरे प्रकरणही उजेडात आले आहे. ‘बंटी-बबली’च्या या प्रतापात सव्वाशे लोकांना दोघा भामटय़ांनी तब्बल १७ लाख रुपयांचा गंडा घातला. केशव चाटसे यांच्या तक्रारीवरून आरोपी श्रावण गणपत माने व त्याची पत्नी सविताविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला.
शहरात यापूर्वी वीरभद्र हांडेकर व त्याची पत्नी जयश्री यांनी साईकृपा इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणाची चर्चा चालू असतानाच दामदुप्पट करून देण्याचा दुसरा प्रताप आरोपी श्रावण व त्याची पत्नी सविता या दोघांनी केल्याचे उघड झाले. चाटसे यांच्या तक्रारीवरून हा प्रकार उघडकीस आला.
ठाणे येथील श्रावण गणपत माने व त्याची पत्नी सविता यांनी फिनिक्स गोल्ड रिअलकॉन कंपनीच्या माध्यमातून ३ ते ६ वर्षांत पसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून सुमारे सव्वाशे लोकांना १७ लाखांनी गंडविल्याचे हे प्रकरण आहे. चाटसे यांनी तक्रारीत म्हटले आहे, की ३ व ६ वर्षांत दामदुपटीचे आमिष दाखवून आरोपी श्रावण व सविताने चाटसे यांना ग्राहक करून, त्यांचा अर्ज तयार करून घेतला व त्यालाच एजंट म्हणून काम करण्यास सांगितले. या रकमेची मुदत संपल्यानंतर श्रावण िहगोलीत आला. त्याने चाटसे यांच्याकडे सर्व ग्राहकांचे त्यांनी गंडविलेल्या रकमेच्या दुपटीचे धनादेश दिले व तो निघून गेला. चाटसे व ग्राहकांनी बँकेत धनादेश वटविण्यास नेले असता खात्यात रक्कमच नसल्यामुळे धनादेश वटलेच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चाटसे यांनी पोलिसांत तक्रार दिली.