News Flash

बदलापूरमध्ये किरकोळ वादातून जिवंत जाळले

आरोपीला अटक, ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्यानुसार कारवाई

संग्रहित छायाचित्र

बदलापूर येथे किरकोळ वादातून पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे गंभीररीत्या होरपळलेल्या ४८ वर्षीय व्यक्तीचा बुधवारी मृत्यू झाला.

चंद्रकांत पवार (४८) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी निखिल गुरव (२५) याला अटक केली आहे. या हत्या प्रकरणात आरोपीवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदलापूर जवळच्या डोणे गावात हा प्रकार घडला.

डोणे येथील विश्वनाथ अपार्टमेंटमध्ये चंद्रकांत पवार राहत होते. त्यांची मुलगी वीज बिल घेण्यासाठी संकुलातील सी विंग या इमारतीत गेली होती. तेथे तिचा प्रमिला गुरव यांच्याशी किरकोळ वाद झाला होता. त्याचा जाब विचारण्यासाठी प्रमिला यांचा मुलगा निखिल १० सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता मद्याच्या नशेत चंद्रकांत यांच्या घरी गेला. तेथे त्याने चंद्रकांत यांच्या पत्नी आणि मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. चंद्रकांत यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताच आरोपी निखिल याने त्यांच्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. गंभीररीत्या होरपळलेल्या चंद्रकांत यांना वांगणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि त्यानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईला हलवण्यात आले होते. बुधवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या हत्या प्रकरणातील गुन्ह्य़ात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातील कलमांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार संबंधित कलमाचा समावेश गुन्ह्य़ात करण्यात आल्याची माहिती कुळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांनी दिली. तसेच या प्रकरणात आता हत्येचे कलमही लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास मुरबाडच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:01 am

Web Title: burned alive from a minor dispute abn 97
Next Stories
1 राज्यातील ६ लाख ऊसतोड कामगारांना विमा कवच
2 कोल्हापूर: भाजपाने साजरा केला मोदींचा वाढिदवस, विरोधकांनी केलं भीक मागो आंदोलन
3 महाराष्ट्रात २४ हजार ६१९ नवे करोना रुग्ण, ३९८ मृत्यू
Just Now!
X