शिर्डीजवळ अपघातात चार ठार, चार जखमी
शिर्डीजवळ नगर-मनमाड महामार्गावर, निर्मळ पिप्री गावाच्या शिवारात, पवनचक्कीच्या पात्यांची वाहतूक करणाऱ्या मालमोटारीला मागील बाजूने खाजगी लक्झरी बस धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले. महामार्ग वाहतूक पोलिसांनी हप्ता वसुलीसाठी मालमोटर अडविल्याने हा अपघात घडला. मृत मध्यप्रदेशातील असून ते कुंभमेळ्याहून पुण्याकडे जात होते.
ही घटना आज, रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. जखमींवर शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत, तर मृतदेह लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. जितेश रामरतन, मुकाशी (४३, रा. खरगोण, मध्यप्रदेश), अर्चना अनुप शहा (३४रा. उज्जन), रचना रितेश जैन (३८रा. उज्जन), राकेश (बसचा क्लिनर, पूर्ण नाव नाही) अशी मृतांची नावे आहेत. विमला गुलशन धुप्पड (६०), वीरेश चढ्ढा (दोघे रा. नगर), रितेश दिनेशकुमार जैन व त्यांचा मुलगा जनक रितेश जैन (१३ रा. उज्जन) हे जखमी आहेत.
मालमोटर पवनचक्कीचे लांबलचक पाते घेवून नगरच्या दिशेने जात असताना लक्झरी बसने मागून जोराची धडक दिली. पाते बसमध्ये घुसल्याने दुर्घटनेत बसचा चालक, क्लिनरसह दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला अपघातानंतर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. लोणी व राहाता पोलिस तसेच स्थानिक नागरीकांनी मदत केली. लक्झरी बस उज्जैनहून पुण्याला जात होती. यात कुंभमेळयाहून परतताना भाविकांवर काळाने घाला घातला. पाते आतपर्यंत घुसल्याने बसच्या आतील भागाचा चक्काचूर झाला.
हा अपघात महामार्ग पोलिसांच्या हप्ता वसुलीमुळे झाला असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. पहाटे सरकारी गाडी लावून
परप्रांतीय वाहन चालकांकडून हप्ता वसुली सुरु असताना पुढे उभ्या करुन ठेवलेल्या वाहनांमुळे मालमोटर अचानक उभी राहिली, भरधाव वेगात आलेल्या बस चालकाला हा प्रकार लक्षात न आल्याने तो गाडी ओव्हरटेक करत असताना अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या परिसरात नेहमीच वसुली चालू असताना अपघात घडतात.