डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आंदोलनामुळे ज्यांचे व्यावसायिक नुकसान झाले त्यांनी त्यांची हत्या केली असावी, अशी शक्यता धरून गुन्हेशाखा आणि पोलीस तपास करीत आहेत. आरोपींच्या तपासासाठी मुंबई, सातारा, नाशिक या ठिकाणी पथके गेली आहेत. दरम्यान, याप्रकरणी अद्यापपर्यंत कोणालाही अटक अथवा ताब्यात घेतलेले नाही, अशी माहिती सहपोलीस आयुक्त संजीवकुमार सिंघल यांनी मंगळवारी दिली.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला आठ दिवस उलटले तरी हल्लेखोर फरार आहेत. गुन्ह्य़ाच्या तपासात पुणे व मुंबई पोलीस तसेच दहशतवादविरोधी पथकही सहभागी आहेत. पोलिसांनी आतापर्यंत सर्व शक्यता पडताळून पाहिल्या आहेत. मात्र, ठोस असे काही समोर आलेले नाही. काही शक्यता तपासल्यानंतर त्या वगळण्यात आल्या आहेत. काही ठरावीक शक्यतांवर पोलिसांचा तपास सुरू आहे. आतापर्यंत पोलिसांनी अनेकांकडे चौकशी केली आहे. त्याच बरोबर कारागृहातील सराईत गुन्हेगारांकडे तपास केला आहे. डॉ. दाभोलकर यांच्या आंदोलनामुळे व्यावसायिक नुकसान झाले, त्यांनी ही हत्या घडवून आणली का याचा पोलीस तपास घेत आहेत. पोलिसांकडून अशा काही जणांची चौकशी करण्यात आली आहे. पण, याबाबत पोलीस सहआयुक्त संजीवकुमार सिंघल यांनी तपासाच्या दृष्टिकोनातून अधिक माहिती देणे योग्य नसल्याचे सांगितले. याप्रकरणी योग्य दिशेने तपास सुरू असून कोणाला अटक अथवा ताब्यात घेतले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.