23 January 2020

News Flash

५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण

हर्ष ईश्वर नचवाणी (१७) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

यवतमाळ : एका सायकल व्यावसायिकाच्या मुलाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली. हर्ष ईश्वर नचवाणी (१७) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. सकाळी ११ वाजताच्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील त्याच्या घराजवळूनच दोन अज्ञात तरुणांनी चाकूचा धाक दाखवून त्याचे अपहरण केले.

हर्ष घराजवळ शिवाजी बगिचाच्या रस्त्याने जात असताना पल्सर दुचाकीने आलेल्या दोन अपहरणकर्त्यांनी त्याला चाकूचा धाक दाखवून वाहनावर बसवले व पसार झाले. त्यानंतर मुलास निर्जनस्थळी नेऊ न त्याचे कपडे उतरवून त्याच्याकडून वडिलांना ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा व्हिडीओ बनवून तो ईश्वर नचवाणी यांना पाठवण्यात आला. या व्हिडीओत मुलगा आपल्याला सोडवण्यासाठी ५० लाख रुपये अपहरणकर्त्यांना देण्याची विनंती वडिलांना करीत आहे. या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास मुलास जिवंत मारण्याची धमकी अपहरणकर्त्यांनी दिल्याने दुपापर्यंत मुलाच्या कुटुंबीयांनी कुठेही वाच्यता केली नाही. कुटुंबीयांनी मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न चालवला. अखेरीस काही नातेवाईकांनी मध्यस्थी करून याप्रकरणी पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले.

अवधूतवाडी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी शिवाजी नगरातील घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली. अपहरणकर्त्यांचे मोबाईल लोकेशन शहरालगतच्या लोहारा औद्योगिक वसाहतीत सापडल्याने स्थानिक गुन्हे शाखा व पोलिसांनी सायंकाळी या परिसरात शोधमोहीम राबवली. मात्र रात्री ९ वाजेपर्यंत अपहरणकर्ते व मुलाचा शोध लागला नव्हता.

याप्रकरणी ईश्वर नचवाणी यांच्या तक्रारीवरून अज्ञात अपहरणकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अपहरणकर्ते चार जण असल्याचे सांगण्यात येते.

अपहरणाच्या सर्व शक्यता पडताळून पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली. हर्षचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे वेगवेगळे सहा पथक तयार करण्यात आले असून शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप मुपडे यांनी दिली.

First Published on July 16, 2019 1:48 am

Web Title: businessman son kidnapped for 50 lakh ransom zws 70
Next Stories
1 कोयनेतील नौकाविहाराचा निर्णय महिन्याभरात
2 विवाहित प्रेमीयुगुलाची आत्महत्या
3 विदर्भात पुन्हा दुष्काळाची भीती
Just Now!
X