मोहन अटाळकर

फासेपारधी समाजातील मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावी, यासाठी सातत्याने संघर्ष करून ‘प्रश्नचिन्ह’ शाळा चालवणाऱ्या मतीन भोसले यांच्या अडचणी दूर होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. समृद्धी महामार्गासाठी अडसर ठरणारी शाळेची सहा खोल्यांची इमारत सहा महिन्यांपुर्वी बुलडोजरच्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण शाळेचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. पण, त्यानंतर जमीन मिळायचे दूर आता मतीन भोसले यांना महामार्गाचे काम बंद पाडल्याबद्दल १.३४ कोटी रुपये दंड भरण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारमधील अधिकाऱ्यांना गोरगरिबांपेक्षा ठेकेदार किंवा कंत्राटदारांची जास्त कणव बघायला मिळाली.

अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे सुमारे तीन एकर परिसरात कोणत्याही शासकीय मदतीविना मतीन भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केवळ लोकसहभागातून निवासी शाळा उभारली. फासेपारधी समुदायातील शिक्षणापासून वंचित असलेल्या सुमारे साडेचारशे मुलांना मतीन भोसले हे शिकवत आहेत. शिक्षकाची नोकरी सोडून वंचितांच्या शिक्षणासाठी स्वत:ला वाहून घेण्याचे व्रत त्यांनी स्वीकारले. आधी तात्पुरत्या उभारलेल्या टिनाच्या शेडमध्ये ही शाळा सुरू झाली होती. ‘मैत्र मांदियाळी‘ या संस्थेने मुलांच्या भोजनाची व्यवस्था केली. निवासासाठी नंतर एक इमारतही उभी झाली. २०१६ मध्ये दैनिक लोकसत्ताच्या ‘सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून सहा खोल्यांची शाळेची इमारत उभी झाली. सारे काही स्थिरस्थावर होईल, असा आशावाद मतीन भोसले आणि त्यांचे सहकारी बाळगून असतानाच समृद्धी महामार्गात शाळेची इमारत उध्वस्त झाली. गेल्या मार्च महिन्यात मतीन भोसले आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळा वाचवण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. त्यावेळी त्यांना पर्यायी जमीन देण्याचे आश्वासन देण्यात आल्याने उपोषण स्थगीत करण्यात आले. त्यानंतर जुलैमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला. मतीन भोसले यांची जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी चर्चा झाली. पर्यायी जमिनीचा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. मतीन भोसले यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली होती, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक संकेत देत शाळा उभारून  दिली जाईल, असे सांगितले होते. आता सरकार बदलले आहे, पण मतीन भोसले यांच्या ‘प्रश्नचिन्ह’ आश्रमशाळेसमोरील प्रश्न कायम आहेत.

चिंता कायम

ज्या झोपडीवजा पत्र्यांच्या खोल्यांमधून शाळा सुरू झाली, त्या ठिकाणी सहा खोल्यांची शाळा सुरू झाली, पण आता त्या बांधकामासह वाचनालय, विहीर, बोअरवेल महामार्गात उध्वस्त झाली आहे. निवासासाठी बांधलेली इमारत मात्र वाचली आहे. समृद्धी महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामध्ये या जागेवरील संपूर्ण बांधकाम उध्वस्त करण्यात आले. तसेच या जागेतील एकूण असलेली २५० मोठी झाडे तोडण्यात आलेली आहेत. समृध्दी महामार्गाच्या कंपनीने संस्थेसोबत लेखी करार केला आहे. त्यामध्ये कंपनीने सामाजिक दायित्व निधीतून ५१ लाख रुपये देण्याचे कबूल केले असून या ५१ लाख रूपयांपैकी फक्त ३४ लाख रुपये इतकी रक्कम संस्थेला देण्यात आलेली आहे. संस्था संचालकाच्या आई सखु शंकर भोसले यांच्या मालकीचे शेत मंगरूळ चव्हाळा येथे आहे. शाळेच्या प्रकल्पापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या शेतामधील १ एकर जागा या प्रकल्पा करीता वापरण्याची परवानगी सखूबाई शंकर भोसले यांनी दिल्यानंतर विद्यार्थ्यांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्याच्या दृष्टीने या शेता मध्ये ३५ लाख रुपये खर्च करून विहीर बांधण्यात आली. या विहीरीच्या खोदकाम व बांधकामा मध्ये कंपनीने दिलेले १९ लाख रूपये खर्च करण्यात आले. उर्वरीत २६ लाख रूपये कर्ज घेवून विहीरीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. समृध्दी महामार्गामध्ये पक्की इमारत, वाचनालय, दोन पाण्याच्या विहीरी आणि २५० झाडे असे २ कोटी ७७ लाख रुपये इतक्या रकमेचे नुकसान झालेले आहे, असे संस्थाचालकांचे म्हणणे आहे.खेळाचे मैदान पूर्णपणे नष्ट झाले आहे. तसेच वाचनालय उद्ध्वस्त करण्यात आले आहे. पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. हे पुनर्वसन केव्हा होणार, हा शाळेतील मुलांना भेडसावणारा प्रश्न आहे.

मतीन भोसले यांना दंडाची नोटीस

नुकसानभरपाई, पुनर्वसनासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या हालचाली नसताना समृद्धी महामार्गाचे एक किलोमीटरचे बांधकाम थांबविल्यामुळे कंपनीचे सहा महिन्यांत १.३४ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून हे नुकसान तूम्ही भरून द्यावे, अशी उलट नोटीस मतीन भोसले यांना मिळाल्यानंतर ते चांगलेच हादरून गेले. त्यांनी या नोटिशीला उत्तर दिले आहे. समृद्धी महामार्गामुळे शाळेतील मुलांचे शैक्षणिक आयुष्य उध्वस्त झाले, त्याची भरपाई कोण देणार, असा सवाल मतीन भोसले यांनी केला आहे.

समृद्धी महामार्गामुळे प्रश्नचिन्ह आश्रमशाळेतील शैक्षणिक कार्यच ठप्प पडल्यासारखे झाले आहे. या शाळेचे संपूर्ण पुनर्वसन करून मिळावे शाळेच्या झालेल्या नुकसानीच्या तुलनेत मिळणारी रक्कम तुटपूंजी आहे. नवीन जागेच्या प्रस्तावावर अजूनही कोणत्याही प्रकारचा निर्णय नाही. शाळेची विहीर बुजविण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुलांना खेळाचे मैदान राहिलेले नाही. जे उध्वस्त करण्यात आले, त्याची पुनर्उभारणी तात्काळ आवश्यक आहे.  – मतीन भोसले, संस्थापक, प्रश्नचिन्ह आश्रमशाळा

मंगरूळ चव्हाळा येथील आश्रमशाळेसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जमिनीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून शाळेच्या बांधकामासाठी आधीच निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. – शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, अमरावती</strong>