|| हर्षद कशाळकर

कोकणात आलेल्या उद्योगांनी निसर्गाचा ऱ्हास केला अशी ओरड नेहमीच केली जाते. याच कारणांमुळे इथे येणाऱ्या प्रकल्पांचा विरोध केला जातो. पण निसर्ग आणि उद्योग एकाच ठिकाणी नांदू शकतात. याची शाश्वती वडखळ येथील जेएसडब्ल्यू कंपनीतील फुलपाखरू उद्यानाला भेट दिल्यावर येते. पोलाद उद्योग प्रकल्पात प्लांट शेजारीच उभारण्यात आलेल्या या उद्यानात सध्या रंगिबेरंगी फुलपाखरांची शाळा भरली असल्याचे पाहायला मिळते आहे.

कंपनीने  प्रकल्प विस्ताराबरोबर निसर्गसंवर्धनासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरु केले आहे. यासाठी स्वतंत्र हार्टकिल्चर विभागाची निर्मिती केली आहे. या विभागाच्या माध्यमातून कंपनीच्या विस्तीर्ण परिसरात लहान मोठय़ा ४२ उद्यानांची निर्मिती करण्यात आली आहे. या शिवाय कंपनी परिसरात सेंद्रीय खत निर्मिती प्रकल्प आणि भारतात आढळणाऱ्या ७०० हून अधिक दुर्मिळ वृक्षांची लागवड या विभागाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यात सर्वात लक्ष्यवेधी ठरते आहे ते फुलपाखरू उद्यान. पोलाद प्रकल्पाच्या शेजारी असणाऱ्या मोकळ्या जागेत या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.

फुलपाखरांचा अभ्यास करून या उद्यानात त्यांना आवडणाऱ्या निरनिराळ्या फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यांच्या वास्तव्यास उपयुक्त अशी वातावरण निर्मिती केली आहे. जमिनीतील ओलावा कायम राहावा आणि उद्यान परिसरात दुपारच्या वेळेस सावली राहावी यासाठी नसíगक अधिवास निर्माण करण्यात आला आहे. फुलपाखरांचे प्रजनन आणि संगोपन व्हावे यासाठी वातावरण निर्मिती केली आहे. फुलपाखरांनीही याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

या फुलपाखरू उद्यानात आज ब्लू टायगर, प्लेन टायगर, किंग क्रो, जॅझेंबेल, ग्रेट एग प्लॉय, टॉनी कॉस्टर, कॉम मॉटमॉन, कॉमन रोझ आणि इतर विविध प्रजातींची फुलपाखरे वास्तव्याला आहेत. ब्लू मॉरमान, ब्लू कलिफ नावाचे फुलपाखरूही येथे पाहायला मिळते आहे. हजारो फुलपाखरांचे थवे एकाच ठिकाणी पाहायला मिळणे हा नेत्रसुखद अनुभव ठरतो आहे.

प्रकल्पांमुळे निसर्गाचा ऱ्हास होतो म्हणून त्यांना विरोध करायचा आणि रोजगार नाही म्हणून महानगरांची वाट धरायची अशा दृष्टचक्रात कोकणी माणूस सापडला आहे. मात्र उद्योग आणि निसर्गाची सांगड घातली तर स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध होऊ शकतात. हे यावरून सिद्ध होते. जेएसडब्लू कंपनीच्या प्रदुषणाचा स्थानिक वातावरणावर किती परिणाम झाला.

हा मुद्दा वादातीत असेल, पण कंपनीकडून आता पर्यावरण संवर्धनाचे प्रयत्न सुरु झाले आहेत आणि फुलपाखरांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यात शंका नाही.

‘या फुलपाखरू उद्यानात जवळपास २१ प्रकारच्या फुलपाखरांचे वास्तव्य आहे. फुलपाखरांना नसíगक अधिवास मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. फुलपाखरांकडून या उद्यानाला आता सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. दिड वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आम्हाला हे यश मिळाले आहे.’    – शाम गायधने, उद्यान विभाग प्रमुख