वर्धा : वादग्रस्त समाजमाध्यम ‘टिकटॉक’च्या माध्यमातून घोरपडीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार उघडकीस आल्यानंतर पळून जाणाऱ्या तीनपैकी एकाला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. आर्वीलगत शिरपूर रोड परिसरातील पारधी वसाहतीत दुर्मीळ घोरपडीची खरेदी-विक्री होत असल्याची चित्रफित ‘टिकटॉक’च्या माध्यमातून प्रसारित झाली.

एकाने ही चित्रफित जिल्हा उपवनसंरक्षक डॉ. सुनील शर्मा यांच्या मोबाईलवर पाठवली. त्यांनी आर्वीचे वनाधिकारी दिलीप दुडे यांना याविषयी सूचित केले. चित्रफित पाहिल्यावर हा परिसर शिरपूरचा असल्याचे लक्षात आल्यानंतर सापळा रचण्यात आला. वनखात्याच्या चमूने पारधी वसाहतीवर छापा मारला. एका कर्मचाऱ्याने सहाशे रुपयात एका घोरपडीची खरेदी केली.

पिशवी घेत असतानाच छापा असल्याचे लक्षात आल्यावर आरोपी राजपूत भोसले, विनोद पवार, अमोल पवार यांनी खरेदीस आलेल्या दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्यांना मारहाण करीत आरोपी पिशवी घेऊन पसार झाले. यानंतर वनाधिकारी दुडे यांनी आर्वी पोलिसांकडे तक्रार केली. तीनही आरोपी फरार झाल्याने वनखात्यावर नामुष्की ओढवली होती. पण अखेर राजपूत भोसले या एका आरोपीस पकडण्यात यश आले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.