काँग्रेसच्या शिवाजीराव देशमुख यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करण्यात राष्ट्रवादीला भाजपने सहकार्य केल्यानंतर आता तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा निवडणुकीत उमेदवारी टाळून सहकार्य घेण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यामुळे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. आबा पाटील यांच्या अकाली निधनानंतर होत असलेली पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत.
    तासगाव-कवठे महांकाळसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, कालपासून उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीने आबांच्या पत्नी सुमन पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असून, त्या आपला उमेदवारी अर्ज २४ मार्च रोजी दाखल करणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तासगाव येथे पाटील यांना उमेदवारी जाहीर करीत असताना ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करण्याचे सर्वच विरोधी पक्षांना आवाहन केले होते.
    आबांच्या अकाली निधनामुळे होत असलेल्या पोटनिवडणुकीत आबांच्या कुटुंबीयातील सदस्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर होत असेल तर आपला उमेदवार असणार नाही, असे संकेत यापूर्वीच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम आणि नेते डॉ. पतंगराव कदम यांनी दिले होते. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा नांदगावकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनीही बिनविरोध निवडणुकीस सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शेकापनेही उमेदवार उभा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.या पाश्र्वभूमीवर भाजपचे खा. संजयकाका पाटील आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कवठे महांकाळ आणि चिंचणी येथे झालेल्या बठकीत कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला होता. याबाबत पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदींसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची गेले दोन दिवस मुंबईत बठक झाली. सोमवारी विधान परिषदेचे सभापती देशमुख यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर होताच तासगावचा निर्णय बुधवारी घेण्यात आला.
    आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तासगावची निवडणूक लढवण्यास प्रतिकूलता दर्शवत निवडणूक लढवण्यापेक्षा आबांना श्रद्धांजली म्हणून या वेळची निवडणूक अविरोध करण्याचा सल्ला भाजपच्या जिल्हा नेत्यांना दिला आहे. याबाबतचा पक्षाचा अधिकृत निर्णय येत्या दोन दिवसांत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जाहीर करतील असे पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी संकेत दिले.