महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त मिळाल्याचे दिसत आहे. ख्रिसमसअगोदर म्हणजेच २५ डिसेंबर अगोदरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. काँग्रेसचे नेते खासदार हुसेन दलवाई यांनी याबाबत माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरून सरकारवर जोरदार टीका केली.

काँग्रेस नेते हुसेन दलवाई आज औरंगाबादमध्ये होते, यावेळी त्यांनी सायंकाळी पत्रकारपरिषदेत मंत्रिमंळड विस्ताराबाबत माहिती दिली.  मंत्रिमंडळावरून महाविकासआघाडीमधील तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचेही दलवाई यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवाय, २५ डिसेंबर अगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रिमंडळ विस्तार करतील असे त्यांनी सांगितले.यावेळी दलवाई यांनी हे सरकार पाच वर्षेच नाहीतर आगामी २५ वर्षे टिकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

या अगोदरही त्यांनी, सरकार पडावे म्हणून कोणी पाण्यात देव बुडून बसले असतील, तर त्यांची निराशा होईल. हे सरकार पाच वर्षे निर्धोकपणे चालेल. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात कितीही मतभेद असले तरी ते एकमेकांशी जुळवून घेतील, असे सांगितले होते.