रविवारी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा होती. त्या विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला आहे. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे. तर आरपीआयतर्फे अविनाश महातेकर शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शपथविधी सोहळा राजभवन येथील गार्डनवर पार पडणार आहे.

मंत्रिमंडळात सात जागा रिक्त आहेत. या जागांवर कोणत्या नेत्यांची वर्णी लागते ते पहाणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. पुढील आठवड्यात विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होईल. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जातो आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.