सत्तेची पदे देत असताना भाजपाच्या निष्ठावंताना निश्चितपणे संधी दिली जाईल आणि सांगलीला मंत्रिपदाची संधी नक्की देण्यात येणार असल्याचे भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी रविवारी पत्रकार बैठकीत सांगितले.
भाजपाच्या सदस्य नोंदणीची मोहीम सध्या सुरू असून त्याचा आढावा घेण्यासाठी सांगलीतील टिळक स्मारक येथे बैठक झाली. या बैठकीनंतर सहस्रबुद्धे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार, पश्चिम महाराष्ट्र सहसमन्वयक मकरंद देशपांडे आदींसह भाजपाचे कार्यकत्रे उपस्थित होते.
मोदी सरकार काळा पैसा देशात आणण्यासाठी ठाम आहे. त्याची यादीही तयार आहे. मात्र यापूर्वीच्या सरकारने केलेल्या कायद्याचा अडसर निर्माण झाल्याने विलंब होत आहे. त्यावर मातही करता येईल मात्र निश्चित कालावधी सांगता येणार नाही. पक्षाची लोकप्रियता वाढल्याने सदस्य नोंदणीसाठी गर्दी होत असून पक्षाकडे कार्यकर्त्यांचा लोंढा लागणे स्वाभाविक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
राज्य मंत्रिमंडळात सांगलीला डावलले जात असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता ते म्हणाले, की निष्ठावंताना संधी देण्यात येईल. पुढील मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीचा विचार केला जाणार असल्याने कार्यकर्त्यांनी संशय बाळगण्याचे कारण नाही. जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांला तर सत्तेची पदे देण्याचा इरादा पक्का असून फक्त विलंब होत आहे, हे लक्षात घ्यावे असेही त्यांनी सांगितले.